वेगळ्या विदर्भासाठी महाराष्ट्र दिनी उमरेड कोळसाखानी समोर होणार कोयला रोको आंदोलन


प्रशांत चंदनखेडे वणी 

विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन एल्गार पुकारला असून मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ राज्य मिळवू औंदा ही घोषणा करीत १ मे ला महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदविण्याकरिता केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा खनिजाचे उत्पादन करून वीज निर्मिती करिता विदर्भातुन जाणारा कोळसा रोखून धरण्याचा निर्धार समितीच्या वतीने करण्यात आला असून विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारा उमरेड कोळसाखानी समोर कोयला रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विश्राम गृह येथे नुकतीच विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा पार पडली. त्यात ही आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. १ मे ला दुपारी १२ वाजता पासून उमरेड कोळसाखानी समोर हे कोयला रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाची मागणी १८ वर्षांपासून सुरु असून विदर्भराज्य आंदोलन समितीने सतत १२ वर्षांपासून आंदोलनाची मालिका सुरु ठेवली आहे. त्यामुळे आता ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वेगळे विदर्भ राज्य मिळवूनच राहू हा निर्धार करून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कायमचा निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेगळ्या विदर्भासाठी ही आरपारची लढाई समजून तिचा बिगुल वाजविण्याच्या दृष्टीने हे संघर्षात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय आंदोलन समितीने घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिंकू किंवा मरू या तऱ्हेने ही लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला असून विदर्भ राज्य निर्मितीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा चंग विदर्भ राज्य आंदोलन समितीने बांधला आहे. लाठी खाऊ, गोळी खाऊ पण आता विदर्भ राज्य मिळवूनच घेऊ, ही प्राण प्रतिज्ञा करून विदर्भ राज्य आंदोलन समिती आता सरकार विरुद्ध तीव्र संघर्ष करणार आहे. 

खनिज संपत्तीने नटलेल्या विदर्भाच्या नशिबी नेहमीच दुर्दैव आलं आहे. विदर्भातील खनिजावर संपूर्ण महाराष्ट्राची भिस्त आहे. कोळसा खनिजाच्या उत्पादनात विदर्भ अग्रेसर आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोळसा खनिजाचा मोठा साठा आहे. कोळसा खनिजातुन भरघोस उत्पन्न मिळवून देणारे विदर्भातील हे तीन जिल्हे आहेत. कोळसा उत्पादनातून कोट्यावधींचं उत्पन्न केंद्र सरकारला मिळतं. पण विदर्भातील जनतेला खनिज उत्पादनाचा कुठलाही लाभ मिळतांना दिसत नाही. उलट कोळसाखाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना येथील जनतेला करावा लागतो. कोळसाखाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने येथील जनतेला ना-ना विध आजारांनी ग्रासले आहे. विदर्भातील कोळसाखाणीने वेढलेल्या भागांची हरियाणा येथील व्ह्रदय रोग तज्ज्ञांनी ४ ते ५ वर्षांपूर्वी पहाणी केली होती. त्यावेळी त्यांनी सरकारला अहवाल दिला होता की, ५ वर्षात प्रदूषण नियंत्रणात न आल्यास येथील नागरिकांना व्ह्रदय रोगाचा धोका संभवू शकतो. देशात सर्वात जास्त व्ह्रदय रोगी विदर्भात व खास करून चंद्रपूर जिल्ह्यातील असतील. कोळसाखाणींच्या प्रदूषणामुळे अनेकांना व्ह्रदय विकाराच्या समस्या उद्भवू देखील लागल्या आहेत. ६८०० मेगावॅट वीज निर्मिती विदर्भात होते. त्यापैकी केवळ २२०० मेगावॅट वीज विदर्भाला दिली जाते. विदर्भात ५८ टक्के शेतपंपाचा अनुशेष असून ६ ते १२ तास लोडशेडिंग विदर्भातील जनतेला सहन करावी लागत आहे. 

महाराष्ट्रावर ६ लाख ६० हजार कोटी एवढे कर्ज असून महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. अंतर्गत मार्ग, राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन केलेल्या विदर्भातील जमिनीचा येथील शेतकऱ्यांना मोबदला देण्याकरिता राज्य सरकारने एम.एस.आर.डी.सी. ला ६५ हजार कोटीचे कर्ज घेण्यास परवानगी दिली आहे. त्याची थकहमी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे हा कर्जाचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार असून महाराष्ट्र राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरु आहे. विदर्भातील जनता १०० वर्षे जरी महाराष्ट्रात राहिली तरी त्यांचे दिवस पालटणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून १ मे ला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलक या दिवशी काळे वस्त्र, काळ्या टोप्या व काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होणार आहे. आता खूप झालं तुमचं, मुकाट्यानं विदर्भ राज्य द्या आमचं. वेगळ्या विदर्भाचा बुलंद झाला आवाज, वेगळ्या विदर्भासाठी प्राणाची बाजी लावू आज, ही गर्जना करित १ मे ला विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ राज्याच्या मागणीकरिता तीव्र आंदोलन छेडणार असून उमरेड कोळसाखानी मधून बाहेर जाणारा कोळसा रोखून धरणार आहे. विदभाचे नेते ऍड. वामनरप चटप यांच्या नेतृत्वात व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, राजू पिंपळकर, बाळासाहेब राजूरकर, नामदेवराव जनेकर, देवा बोबाटे, होमदेव कन्नके, धीरज भोयर, संजय चिंचोळकर, अनिल टोंगे, मोहन हरडे, काशीनाथ देऊळकर, शशिकांत नक्षीने, विजय बोबडे, रामजी महाकूलकर, पांडुरंग पंडिले, अशोक चौधरी, नीलिमा काळे, कलावती क्षीरसागर, नारायण मांडवकर, सुभाष वैद्य यांच्या उपस्थितीत हे कोयला रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी