वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय, महाविकास आघडीतील अंतर्गत नाराजी ठरली पराभवास कारणीभूत
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी एकता पॅनलने एकहाती विजय मिळवित बाजार समितीत आपली सत्ता कायम केली. १८ पैकी १४ जागांवर शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर महाविकास आघाडी प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले. शेवटी मतदारांना कपबशीतलाच चाय चविष्ट लागल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या निवडणुकांचे निकाल रात्री उशिरा जाहीर झाले. त्यात शेतकरी एकता पॅनलने १८ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळावीत बाजार समितीत सत्ता काबीज केली. बाजार समितीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ३६ अधिकृत तर दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी सहकारी संस्था गटातील १० व ग्रामपंचात गटातील ४ जागांवर भाजप प्रणित शेतकरी एकता पॅनलच्या उमेदवारांनी विजय संपादन केला. तर व्यापारी अडते व हमाल गटातील तिन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. सहकार संस्था गटातील आरक्षित जागेवर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आला.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. ऍड. विनायक एकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकता पॅनल तर माजी आमदार वामनराव कासावार व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यात शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार सरस ठरले. त्यांनी एकहाती विजय खेचून आणला. महाविकास आघाडतील अंतर्गत धुसपूस पराभवास कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत होती. महाविकास आघाडी पासून राष्ट्रवादी दूर राहिली. घटक पक्षही महाविकास आघडतीत दिसून आले नाही. शेतकरी संघटनांनाही सोबत घेण्यात आले नाही. अनुभवी नेत्यांना दूर ठेवण्यात आले. काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेच महाविकास आघाडीच्या सीट वाटप करून निवडणूक लढविली. त्यामुळे महाविकस आघाडीशी संबंधित असलेले त्यांचे खंदे समर्थक नाराज दिसून येत होते. ही नाराजीच विजयला भोवल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमधून ऐकायला मिळत होती. रणनीतीकार, राजकीय धुरंधर व अनुभवी राजकारणी समजल्या जाणाऱ्या दोन माजी आमदारांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा पुढील वाटचालीकरता मोठा धक्का मानला जात आहे. दोन्ही राजकीय नेत्यांच्या संगठनाचा अभाव या निवडणुकीत दिसून आला. आपापसातील समन्वयाच्या अभावामुळे महाविकास आघाडीला पराभवाची चव चाखावी लागल्याच्या चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत.
या उलट आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चेबांधणी केली. त्यांनी आपली पूर्ण ताकत निवडणुकीच्या प्रचारात लावली. शेवटी प्रत्येक निवडणुकच प्रतिशेठेची असते, हे त्यांना कळून चुकले होते. प्रत्येक निवडणूक महत्वाची असते, मग ती सहकार क्षेत्रातील का असेना. आमदार बोदकुरवार यांनी निवडणुकीच्या रणनीतीची सूत्रे आपल्या हाती घेत महाविकास आघाडीतील नाराजीला हेरून आपल्या विजयाची पताका उडविली. सहकार क्षेत्रातील एका महत्वाच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या आमदारांनी या निवडणुकीत आपली सर्व शक्ती पणाला लावली. या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आगामी निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आमदारांचे डावपेच या निवडणुकीत यशस्वी ठरले. त्यांच्या पॅनलच्या १४ उमेदवारांनी विजय संपादन केला. तर महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे त्यांचे काही उमेदवार थोड्या थोडक्या मतांनी पराभूत झाले. या निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा शोधून आत्मचिंतन करण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला दणदणीत पराभव त्यांच्या संघटन बांधणीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षातील अंतर्गत नाराजी आगामी निवडणुकांना प्रभावित करणारी ठरू शकते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या पराभवापासून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सहकारी संस्था गटातील शेतकरी एकता पॅनलचे 𝅕ऍड. विनायक एकरे, 𝅕नितीन पानघाटे, 𝅕प्रभाकर बोढे, 𝅕दिलीप बोढाले, 𝅕मंगल बलकी, 𝅕मोहन वरारकर, 𝅕अशोक पिदूरकर, 𝅕वेनूदास काळे, 𝅕मीरा पोतराजे, 𝅕वैशाली राजूरकर व शेतकरी परिवर्तन पॅनलचे 𝅕प्रमोद वासेकर, यांचा तर ग्रामपंचायत गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी एकता पॅनलचे 𝅕विजय गारघाटे, 𝅕प्रकाश बोबडे, 𝅕चंद्रकांत हिकरे, 𝅕हेमंत गौरकार यांचा तसेच व्यापारी अडते व हमाल गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलचे 𝅕सतिश बडघरे, 𝅕रवींद्र कोंगरे, 𝅕प्रमोद सोनटक्के यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी दोन व्यापाऱ्यांनी कास्तकारांच्या केलेल्या फसवणुकीमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चांगलीच चर्चेत आली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांनी कास्तकारांचा माल खरेदी केल्यानंतर त्यांना चुकारे न दिल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. कास्तकारांचा शेतमाल खरेदी केल्यानंतर व्यापारी कास्तकारांचे चुकारे न देता बेपत्ता झाले होते. नंतर कास्तकारांचा संयम सुटल्याने कास्तकारांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत मोर्चे काढले होते. व्यापाऱ्यांच्या या फसवणूक प्रकरणाने बाजार समितीची विश्वासाहर्ता प्रश्नांकित झाली होती. कास्तकारांची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला पोलिसांनी अटकही केली होती. कास्तकारांना आपल्याच शेतमालाच्या विक्रीचे पसे मिळविण्यात बाजार समितीचे उंबरठे झिजवावे लागले. वेळोवेळी आंदोलने करावी लागली. त्यामुळे बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्याकरिता नेमलेल्या व्यापाऱ्यांविषयी सर्वच स्तरातून असंतोष खदखदत होता. कास्तकारांच्या हिताची समजली जाणारी बाजार समिती कास्तकारांच्या रोषाचे कारण ठरली होती. कास्तकारांच्या न्याय्य हाकांसाठी अनेक राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी त्यावेळी बाजार समितीवर हल्लाबोल केला होता.
Comments
Post a Comment