बहुजनांचं आंबेडकरी विचारांशी नाळ जोडणारं जाहीर व्याख्यान आज वणी शहरात, आंबेडकरी विचार मंचाचं आयोजन
प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने आज २९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता एस.बी. लॉन येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी द्वारा आयोजित या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाला संपूर्ण देशात आंबेडकरी विचारांचं वादळ आणणारे विचारवंत येणार असल्याने हा जाहीर व्यख्यानाचा कार्यक्रम आंबेडकरी विचारधारेला चालना देणारा ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लोकशाही संपन्न देशाच्या प्रगतीत असलेलं योगदान व त्यांनी बहुजनांच्या उत्थानासाठी केलेलं महान कार्य यावर आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या विचारवंतांचे विचार या जाहीर व्यख्यानातून ऐकायला मिळणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत आंबेडकरी विचार मंच स्थापन केला आहे. या आंबेडकरी विचार मंचाने पहिल्याच वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या जाहीर व्याख्यान कार्यक्रमात दिल्ली सरकारचे माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम हे विशेषत्वाने उपस्थित राहणार असल्याने या जाहीर व्याख्यानाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य व विचार जनमानसात रुजविणारे आंबेडकरी विचारवंत इसादास भडके, वामनदादा कर्डक साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सागर जाधव, पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. माधव सरकुंडे यांचे मौलिक विचार या जाहीर व्याख्यानातून ऐकायला मिळणार आहे. वैचारिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या व बाबासाहेबांच्या समाज कार्याची जाणीव जपणाऱ्या नागरिकांनी या जाहीर व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श प्रत्येकानेच घेण्यासारखा आहे. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने शोषित, पीडितांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समानतेची वाट मोकळी करून देणाऱ्या बाबासाहेबांची थोरवी जेवढी गावी तेवढी कमीच आहे. वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत ज्ञानाचा अथांग सागर झालेल्या बाबासाहेबांनी बहुजन समाजात ज्ञानाची ज्योत पेटविली. स्वतः तिरस्कारित जीवन जगलेल्या बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या वाट्याला तिरस्कार येऊ नये म्हणून जीवनभर संघर्ष केला. बहुजनाच्या उत्थानासाठी त्यांनी आपलं अख्ख आयुष्य वेचलं. इंग्रजांच्या राजवटीतही भारतीयांना सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून दिल्या. आरबीआयची स्थापना, बोनसची संकल्पना हे त्यांच्या अथांग ज्ञानातून साकारली. पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष, मंदिर प्रवेशासाठीचा लढा, ही त्यांची मानवी समानतेसाठी केलेली क्रांती होती. देशाची राज्यघटना लिहून त्यांनी लोकशाही प्रधान देश उभा केला. सर्वांना कायद्याची चौकट दिली. मागासवर्गीयांना आरक्षण दिलं. महिलांसाठी सामान हक्क कायदा केला. कामाच्या तासिकाही त्यांनी ठरवून दिल्या. शासकीय नोकरदार महिलांसाठी प्रसूती रजेची तरतूद केली. शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. प्राणी मात्रांनाही कायद्याचं सौरक्षण दिलं. शेत सिंचनाचा प्रश्नही त्यांनी सोडविला. त्यांच्या राजकीय व सामाजिक योगदानाला मुळीच तोड नाही.
पण बाबासाहेबानंतर बाबासाहेबांची चळवळ निस्वार्थपणे पुढे रेटणारा नेताच समाजाला लाभला नाही, ही खंत आजही समाजातून व्यक्त होतांना दिसते. सगळेच स्वार्थाचे पुजारी बनले. नेत्यांनी पोटभरू राजकारण केलं. सामाजिक चळवळीची जबादारी असणारे नेते प्रलोभनाने विभागले गेले. तुकडा फेकला की कुणाच्याही दावणीला बांधल्या गेलेल्या नेते व समाज पुढाऱ्यांनी सामाजिक चळवळीला ब्रेक लावण्याचं काम केलं. वैचारिक दृष्टिकोनापासून तरुणाई दूर लोटली जाऊ लागली आहे. शिक्षणाचा अभाव तरुणांमध्ये दिसू लागला आहे. समाजातील राजकीय नेत्यांच्या बेकीमुळे आजही सामाजिक एकी झाली नाही. आपली राजकीय पोळी शेकण्याकरिता नेत्यांकडून समाजाचा वापर करण्यात आला. अनेकांची राजकीय व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेली मक्तेदारी होतकरू तरुणांना चळवळीत येण्यापासून रोखू लागली आहे. समाजातील नेत्यांच्या पोटभरू राजकारणामुळे सामाजिक ऐक्य लोप पावतांना दिसत आहे. केवळ नावासाठी सामाजिक कार्याचा उदो उदो करणाऱ्या समाज पुढाऱ्यांची समाजात लुडबुड वाढल्याने आंबेडकरी चळवळीला खिंडार पडू लागले आहे. परंतु बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी विचार मंच स्थापन करून जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केल्याने बहुजनांच्या डोक्यात महापुरुषांच्या तत्ववादी विचारांची पेरणी होणार आहे. सिम्बाल ऑफ नॉलेज म्हणून संपूर्ण विश्वाने बाबासाहेबांचा गुणगौरव केला आहे. या महापुरुषाच्या अनुयायांचे वर्तन कसे असावे, ही शिकवणच या जाहीर व्याख्यानातून मिळणार आहे. बहुजनांच्या डोक्यात विचारांची पेरणी करून त्यांच्या जीवनात विध्वतेचा बहर यावा, हा या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आहे.
Comments
Post a Comment