खळबळजनक... अज्ञात माथेफिरुने घरासमोर उभे असलेले वाहन पेटविले, माजी नगर सेवक राजू तुराणकर यांच्या घरासमोरील घटना
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील प्रगती नगर येथे घरासमोर उभे असलेले बुलेरो वाहन अज्ञात माथेफिरुने आग लावून पेटविल्याची खळबळजनक घटना आज ३० एप्रिलला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख तथा माजी नगर सेवक राजू तुराणकर यांच्या मालकीचे हे बुलेरो वाहन असून त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या या वाहनाला अज्ञात माथेफिरुने आग लावून पेटविल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे शहरात ना-ना विध चर्चांना उधाण आले आहे.
प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेल्या राजू तुराणकर यांच्याकडे दोन बुलेरो वाहने असून ही दोन्ही वाहने रात्रीला घरासमोरच उभी असतात. कौटुंबिक प्रवासाकरिता या वाहनांचा वापर केला जातो. काल स्वतः राजू तुराणकर हे काही कामानिमित्त MH ३१ CS ७९०० क्रमांकाच्या बुलेरो वाहनाने यवतमाळला गेले होते. रात्री उशिरा ते घरी परत आल्यानंतर त्यांनी नेहमी प्रमाणे घरासमोर बुलेरो वाहन उभे केले. आज पहाटे २.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला वाहनामधून धूर निघतांना दिसला. वाहनाने पेट घेतल्याचा संशय आल्याने शेजाऱ्याने लगेच राजू तुराणकर यांना फोन करून याबाबत माहिती दिली. राजू तुराणकर यांनी घराबाहेर येऊन पहिले असता त्यांना बुलेरो वाहनाने पेट घेतल्याचे दिसले. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने कशी बशी आग विझविली. त्यानंतर त्यांनी वाहनाचे निरीक्षण केले असता त्यांना दगडाने काच फोडून आग लावल्याचे निदर्शनास आले. अज्ञात माथेफिरुने ही कुरापत केल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच पोलिस स्टेशनला येऊन घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा शोध सुरु केला आहे. घडलेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
शहरात या आधीही अनेक कुरापती घडल्या आहेत. अज्ञात उपद्रवी इसमांकडून घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढेच नाही तर रात्री घरावर दगडाचा मारा केल्याचाही प्रकार घडला आहे. विठ्ठलवाडी येथे काही महिन्यांपूर्वी एकाच रात्री घरासमोर उभ्या असलेल्या तीन आलिशान कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. तर विठ्ठलवाडी येथीलच एका घरावर मध्यरात्री अज्ञात कुरापतखोरांकडून दगडाचा मारा करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला होता. काही दिवसांपूर्वी गौरकार कॉलनी येथील एका घरासमोर उभ्या असलेल्या आलिशान कारच्या अज्ञाताने काचा फोडून परिसरात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर घरमालकाने लगेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. काही उपद्रवी व्यक्तींकडून सातत्याने असे उपद्रव केले जात असल्याने वाहन मालकांचे मोठे नुकसान व परिसरात भीती निर्माण होत असल्याने या उपद्रवी इसमांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment