प्रशांत चंदनखेडे वणी
शहर व तालुक्यात विविध उपक्रम राबवून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालय व प्रशासकीय कार्यालयांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. येथील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयातही ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे संचालक रविंद्र गौरकार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालिका उज्वला गौरकार, प्राचार्य निशांत खोब्रागडे, केराम आदी मान्यवर उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या पोलिस भरती परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातून उत्तीर्ण झालेला आशिष गोखरे व चंद्रपूर जिल्हा विभागातून उत्तीर्ण झालेल्या तेजस्वी गारघाटे या दोन्ही विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देशसेवेचा ध्यास उराशी बाळगून कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर पोलिस भरती यशस्वीपणे पार पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गुणगौरव म्हणून त्यांचा हा सन्मान करण्यात आला असल्याचे मनोगत रविंद्र गौरकार यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम नवघरे यांनी तर आभार प्रदर्शन उज्वला गौरकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमित काळे, राहुल झाडे, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments: