प्रशांत चंदनखेडे वणी
वणी यवतमाळ मार्गावरील राजूर रिंगरोडवर असलेल्या वजन काट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपूरला रेफर केले असता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही अपघाताची घटना काल २ मे ला रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. राजूर रिंगरोडवर मालवाहू वाहनांचा वजन काटा असून या काट्यावर कोळसा वाहतुकीच्या वाहनांचे वजन केले जाते. कोल वॉशरी मधून कोळसा भरून आलेला हा ट्रक राजूर येथील कोळसा सायडिंगवर कोळसा खाली करण्याकरिता जात होता. त्याआधी कोळशाचे वजन करावे लागत असल्याने हा ट्रक वजन करण्याकरिता उभा होता. काट्यावर ट्रकांची रांग लागली असल्याने ट्रक चालकाने मुख्य रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला. दरम्यान वणी वरून राजूरला जात असलेल्या तरुणांची दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने राजूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर वणी येथील त्याचा नातेवाईक गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. पण त्याचाही आज ३ मे ला उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकावर भादंवि च्या कलम २८३, ३३८, ३०४-A, १०४, १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रमांक ३ मधील रहिवासी असलेला श्रीकांत श्रीनिवास (सिनु) दोब्बलवार (२३) हा काही कामानिमित्त वणीला गेला होता. वणी वरून तो आपल्या आत्याचा मुलगा सुमित सुरेश कोमलवार (२३) याला सॊबत घेऊन राजूरला येत असतांना राजूर रिंगरोडवर उभ्या असलेल्या ट्रकला (MH २९ T १८६१) त्यांची दुचाकी (MH ३४ BX ७०७५) धडकली. या भीषण अपघातात श्रीकांत दोब्बलवार या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील त्याचा नातेवाईक सुमित सुरेश कोमलवार (२३) रा. जैताई नगर वणी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे रेफर केले. त्याच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याने आज शेवटचा श्वास घेतला. श्रीकांत दोब्बलवार हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. तो मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने परिसरात तो सर्वांचाच लाडका होता. त्याच्यावर असा हा अकाली मृत्यू ओढावल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. वणी येथील सुमित कोमलवार हा गरीब कुटुंबातील कर्तबगार तरुण होता. कुटुंबाचा तो आधार होता. या दोन्ही तरुणांवर काळाने घाला घातल्याने दोन्ही कुटुंब पुरते हादरले आहेत. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीकांत दोब्बलवार याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.
मुख्य रस्त्यालगतच वजन कांटे असल्याने वजन करण्याकरिता मुख्य रस्त्यांवरच ट्रकांच्या रांगा लागलेल्या असतात. रात्रीच्या वेळेला रस्त्यावर उभे राहणारे हे ट्रक दृष्टीस पडत नसल्याने दुचाक्यांचे अपघात घडू लागले आहेत. रस्त्यावर उभे राहणारे ट्रक अपघातास कारणीभूत ठरू लागले आहेत. उभ्या ट्रकवर दुचाक्या आदळून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अनेक निष्पाप जीवांचा या अपघातात बळी गेला आहे. कोल वॉशरी मधून कोळसा भरून आलेला हा ट्रक कोळशाचे वजन करण्याकरिता रस्त्यावरच रांग लावून उभा होता. कोल वॉशरी मधून राजूर कोळसा सायडिंगवर कोळशाची वाहतूक सुरु असून राजूर रिंग रोडलगत असलेल्या वजन काट्यावर या वाहनांचे वजन केले जाते. त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. बेजाबदारपणे रस्त्यावर ट्रक उभे केले जात असल्याने अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
No comments: