स्वतःचे पंख तिने स्वतःच बळकट केले आणि घेतली उंच भरारी, गरीब कुटुंबातील मुलीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड



प्रशांत चंदनखेडे वणी 

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास हे गुण अंगी असल्यास कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. हालाकीच्या परिस्थितीचा बागलबुवा करून धेय्याची कास सोडणारे नंतर नशिबाला दोष देऊन मोकळे होतात. नशीबच खोटं म्हणत अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडणारे अनेक जन पाहायला मिळतात. पण परिस्थितीवर मात करीत धेय्य गाठणारं सामर्थ्यशाली व्यक्तिमत्व फार कमी पहायला मिळतं. हालाकीच्या परिस्थितीतही लाचार न बनता सदाचारी बाणा ठेवणारी ध्येय्यवेडी तरुणी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत यशाची मानकरी ठरली आहे. परिस्थिती समोर लोटांगण घालणाऱ्या तरुणाईसमोर या तरुणीने एक आदर्श ठेवला आहे. फार वर्षांपूर्वी वणी वरोरा रोडवर असलेल्या चुनाभट्ट्यावर काम करणाऱ्या मजुरांची एक वस्ती तयार झाली. चुनाभट्ट्यावर काम करणारे परप्रांतीय व परजिल्ह्यातील मजूर तेथे वसले. कालांतराने या वस्तीला पट्टाचारानगर हे नामकरण करण्यात आले. कधीकाळी शहराचं शेवटचं टोक असलेली ही वस्ती सोइ सुविधांपासून दुर्लक्षित राहिली. याच वस्तीत लोहारे कुटुंबही वास्तव्यास होतं. अठराविश्व दारिद्र असलेल्या लोहारे कुटुंबातील कु. पूजा विजय लोहारे या तरुणीने परिस्थितीवर मात करीत यशाला गवसणी घातली. स्वप्नांचा पाठलाग केला की, ते यशाचा मार्ग दाखवितात असे म्हणतात. पण त्याकरिता डोळ्यात स्वप्न यायला हवे. परिस्थितीमुळे तिला स्वप्न बघता आले नसले तरी स्वप्नांच्या पलीकडे जाऊन तिने यशाचा मार्ग गाठला. कर्तृत्व, कर्तबगारी व कर्तव्यनिष्ठा यामुळे आज ती प्रतिकूल परिस्थितीतूनही घडली आहे. 

तिने घेतलेल्या परिश्रमाचे तिला फळ मिळाले आहे. कठीण परिस्थितीचा सामना करून तिने उंच भरारी घेतली आहे. तिची राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेकरिता खेळाडू म्हणून निवड झाली आहे. एका अत्यंत गरीब कुटुंबातील व गरीब वस्तीतील मुलगी राष्ट्रीय खेळाडू झाली, ही एक अभिमानाची बाब आहे. उभारी घेण्याकरिता पूरक परिस्थिती नसतांनाही केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर तिने राष्ट्रीय खेळाडू होण्याचं धेय्य गाठलं आहे. पूजा लोहारे या झुंजारू तरुणीची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने वणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

स्वतःचा दीपक स्वतःच होऊन इतरांना प्रकाशमान करावं ही महापुरुषांची शिकवन. अडचणी व संकटं मार्गात येतच राहतील, त्यावर मात करून पुढे गेले की यशाचे दरवाजे खुले होतात. प्रतिकूल परिस्थितीतूनच प्रतिभावंत तयार होतात. चिखलात कमळ उगवतं तसा गरीब कुटुंबातही हिरा जन्माला येतो. आधी गरिब मजुरांची वस्ती असलेल्या व नंतर पट्टाचारा नगर असं नामकरण झालेल्या मागासलेल्या भागात पूजा लोहारे हिचं वास्तव्य. अत्यंत गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. घरात अठराविश्व दारिद्र. अत्यंत हालाकीचं जीवन जगतांना पोटासाठीचा संघर्ष तिने पाहिला. दुःख दारिद्र या कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेलं. बालपणीच पित्याचं छत्र हरपलं. थोडी समज येताच तिने आई सोबत कष्ट उपसले. नुकतंच तिच्या आईचंही निधन झालं. ती पूर्णपणे अनाथ झाली. पण जीवनात यशस्वी होण्याची जिद्द मात्र तिने सोडली नाही. ते म्हणतात ना सोन्यालाच खरं सोनं आहे की नाही म्हणून पारखलं जातं. तसेच मनुष्यालाही आपली योग्यता सिद्ध करण्याकरिता अनेक कसोट्यांमधून जावं लागतं. पूजालाही अनेक कसोट्या पार कराव्या लागल्या. आई वडिलांचा आधार गमावलेल्या पूजाला आपली उपजिविका व शिक्षणाकरिता काम शोधावं लागलं. तिची जीवनात काहीतरी करून दाखविण्याची तळमळ लक्षात घेता दातृत्व भावना ठेवणाऱ्या विराज चिकनकर यांनी तिला अकाऊंटंट म्हणून कामावर ठेवले. तिच्यावर जेमतेम कामाचा भार सोपवून तिला तिचं धेय्य गाठण्यासाठी मोकळीक दिली. मैदानी कवायतीत ती निपुण असतांनाच तिने अनेक मैदानी खेळही गाजविले. पोलिस बनण्याचं स्वप्न ती उराशी बाळगून आहे. तिने अनेक पोलिस भरत्याही दिल्या. पण प्रत्येक वेळी तिची पोलिस होण्याची संधी थोडक्यात हुकली. पोलिस भरती देण्याबरोबरच तिने मैदानी खेळही सुरु ठेवले. विदर्भ व राज्यस्तरावर तिने अनेक स्पर्धा गाजविल्या. तिच्यातील खेळाडूवृत्ती व हुनर पाहून तिची थेट राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेकरिता निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ही या भागातील पहिलीच महिला आहे. तिने या आधी कबड्डी स्पर्धेत विदर्भाचं प्रतिनिधित्व केलं आहे. हे तालुकास्तरावरील एक मोठं यश मानलं जात आहे. पूजा लोहारे ही वणी येथील युवा नवरंग क्रीडा मंडळाची प्रशिक्षणार्थी असून या मंडळाचे कोच योगेंद्र शेंडे यांचं उत्तम मार्गदर्शन तिला लाभलं आहे. वणीच्या मातीत अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व निपजले आहेत. पूजा लोहारे हिने देखील वणीच्या नावलौकिकात भर घातली असून तिची राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत निवड झाल्याने वणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ते म्हणतात ना पंखोसे कुछ नही होता हौसलोसे उडान होती है. पूजा लोहारे या तरुणीने आपले हौसले बुलंद ठेऊन गगनभेदी भरारी घेतली. आपल्या पंखात स्वतःच बळ निर्माण करावं लागतं, कुणी बळ दिल्याने गरुड झेप घेता येत नाही. एकदा आधाराची सवय लागली की भरारी घेण्याकरिता नेहमीच बळ देणाऱ्यांची गरज भासते. कुणाची दया नाही, कुणाचे दान नाही, कुणाला कधी मागितला मदतीचा हात नाही. जिद्द उरी बाळगली आकाशी झेप घेण्याची, तिच्या प्रयत्नांनाही पंख फुटले, आणि दखल घेण्यात आली तिच्या पराक्रमाची. नशिबाला दोष देत रडत बसण्यापेक्षा नशीबच बदलण्याचं सामर्थ्य स्वतःत निर्मण केलं पाहिजे. पूजा लोहारे या तरुणीनं दाखवून दिलं की, नशिबानं नाही तर मेहनतीनं जीवन सफल होतं. खूप वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या बाजूला वसलेली ही मजुरांची वस्ती आहे. सर्व जाती धर्म व वेगवेगळ्या ठिकाणचे लोकं याठिकाणी वास्तव्याला आहे. या वस्तीच्या बाजूला खूप मोठं तळं आहे. अनेकांच्या आठवणीतलं हे तळं आहे. या तळ्यात आधी खूप कमळाची फुलं उगवायची. ही कमळाची फ़ुलं शहरवासियांचं खास आकर्षण असायची. झोपडपट्टी वस्ती असली तरी या वस्तीतील तळ्यात उगविणारी कमळाची फुले बघण्याकरिता शहरातून लोकं यायची. पुजाच्याही लक्षात आलं की, याच वस्तीतून आपल्याला कमळाप्रमाणे उगवायचं आहे. मग तिचीही दखल शहर, तालुका, जिल्हाच नाही तर संपूर्ण राष्ट्र घेईल. हीच मनीषा उराशी बाळगून तिचा स्वतःला घडविण्याचा धेय्य वेडा प्रवास सुरु झाला. जीवनात अनेक अडथळे आले, पण तिने जिद्द सोडली नाही. संकटांनी कधी डोळ्यात पाणी आणलं, पण तिचा आत्मविश्वास डगमगला नाही. तिने परिस्थितीला तोंड दिलं, पण ती कधी कोणापुढे झुकली नाही. परिस्थितीपुढे लोटांगण घालणाऱ्यांकरिता तिने एक आदर्श ठेवला आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो, हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना उद्देशून म्हटले होते. ही महापुरुषांची शिकवन अंगिकारणारे जीवनात यशस्वी झाल्याशिवाय रहात नाही. पूजा लोहारे या तरुणीने आपल्या कौशल्य व कर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत आपलं स्थान पक्क केलं. पूजा लोहारे हिच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे वणीचा गौरव वाढणार असून या मातीचा सुगंध देशात दरवळणार आहे. पूजा लोहारे हिच्या जिद्द, चिकाटी व कर्तुत्वाला लोकसंदेश न्यूज सलाम करते आहे. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीकरता लोकसंदेश न्यूज कडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी