ट्रकची ऑटोला समोरासमोर धडक, महिला व सहा वर्षाची मुलगी जागीच ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
भरधाव ट्रकने ऑटोला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला व तिच्या सहा वर्षाच्या मुलीचा करुन अंत झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी कोरपना मार्गावरील आबई फाट्याजवळ घडली. ऑटो मधील अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ऑटो चालकालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा ऑटो वणी वरून प्रवासी घेऊन कोरपना मार्गाने जात असतांना आबई फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संजना अनंता नागपुरे वय अंदाजे ३७ वर्ष व अवनी अनंता नागपुरे वय अंदाजे ६ वर्ष या दोघीही मायलेकी जागीच ठार झाल्या. तर ऑटो मधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. ऑटोचालक सुनिल बोन्डे हा देखील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लालगुडा येथे मुलीसह आपल्या बहिणीकडे आलेली संजना मुलीला घेऊन कुर्ली या आपल्या गावाकडे ऑटोने परत जात असतांना काळाने हा घाला घातला. संजना हिचे वडील अत्यवस्थ असल्याने दोघीही बहिणी त्यांना भेटण्याकरिता सिंधीवाढोणा येथे गेल्या होत्या. वडिलांची भेट घेतल्यानंतर संजना ही आपल्या बहिणी सोबत लालगुडा येथे आली होती. आज ती कुर्ली या आपल्या गावाकडे परत जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात संजना व तिची मुलगी अवंती हिचा करुन अंत झाला. तर ऑटोतील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत महिला व मुलीचे शवविच्छेदन आज होऊ शकले नाही. उद्या शवविच्छेदना नंतर दोघींचेही मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे शिरपूर पोलिसांनी सांगितले. शिरपूर पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला अटक केली आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
भरधाव ट्रक व रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या ट्रकांमुळे अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. रस्त्यावर बेजबाबदारपणे उभ्या करण्यात येणाऱ्या ट्रकांमुळे निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. आबई फाट्या जवळ रस्त्यावर ट्रक उभा असल्याने विरुद्ध दिशेने येणारे वाहन ऑटो चालकाच्या दृष्टीस पडले नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पास मारून ऑटो समोर निघत नाही तोच समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, ऑटोचा पार चेंदामेंदा झाला आहे. कोरपणाकडे जाणारा ऑटो वणीच्या दिशेने वळल्याचे दिसून येत होते. रस्त्यांवर तासंतास उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कार्यवाहीची मोहीम राबविली जात नसल्याने ट्रक चालक व मालक निर्भीड झाले आहेत. रस्त्यांवर बेजबाबदारपणे उभ्या ठेवण्यात येणाऱ्या व वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment