सतत होणाऱ्या अपघातात जाऊ लागले आहेत निष्पाप जीवांचे बळी, आज आणखी दोन तरुणांना अपघातात गमवावा लागला जीव

प्रशांत चंदनखेडे वणी 

सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकखाली चिरडून दोन तरुणांचा करुन अंत झाल्याची घटना आज १२ मे ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरातील कळमना वळण रस्त्याजवळ घडली. हे दोन्ही तरुण मेघदूत कॉलनीत रहिवासी असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे लग्न समारंभाकरीता आले होते. लग्न घरी काही किरकोळ वस्तू घेऊन जात असतांना काळ आडवा आला, व मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने आपला डाव साधला. दोनही तरुण अविवाहित होते. सिमेंट भरलेल्या ट्रकखाली ते अक्षरशः चिरडल्या गेल्याने त्यांच्या शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरल्या गेले होते. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा ताफाच घटनास्थळी दाखल झाला. एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वणी वाहतूक उपशाखा प्रमुख संजय आत्राम, एपीआय माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सपोनि आशिष झिमटे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. काही काळ जनभावना उफाळून आल्या होत्या. नातेवाईकांमधूनही रोष व्यक्त होत होता. वाहनांच्या देखील दुतर्फा रांगा लागल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. ही सर्व परिस्थिती पोलिसांनी योग्यरीत्या हाताळून वाहतूक सुरळीत केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.  

वणी यवतमाळ मार्गावरील मेघदूत कॉलनी येथे कांबळे यांच्या घरी लग्न सोहळा असल्याने लग्नाला पाहुणे म्हणून आलेल्या स्वप्नील तांदुळकर व जिवन कांबळे या दोन तरुणांचा अपघातात करुन अंत झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले हे दोन तरुण चंद्रपूर व वणी तालुक्यातील परसोडा येथील रहिवासी असल्याचे समजते. २० ते २५ वयोगटातील असलेले हे दोन्ही तरुण आपल्या परिवारासह मेघदूत कॉलनीत लग्न समारंभाकरीता आले होते. लग्न घरी काही किरकोळ वस्तू घेऊन दोन्ही तरुण दुचाकीने (MH २९ AH ८३९१) मेघदूत कॉलनीकडे जात होते. दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला (MH ३४ BG ५१९८) दुचाकीचा हॅण्डल लागल्याने दुचाकी चालकाचे संतुलन बिघडले, व ते दोघेही रोडवर पडले. त्याचक्षणी मागून येत असलेल्या ट्रकने (MH ३४ BG १९८३) या दोन्ही तरुणांना अक्षरशः चिरडले. यात या दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लग्न समारंभाकरीता आलेल्या या दोन्ही तरुणांवर काळाने घाला घातल्याने लग्नाच्या आनंदावर दुःखाचे विरजण पसरले आहे. अपघातस्थळी धाव घेतलेल्या कुटुंबीयांनी तरुण मुलांचे मृतदेह पाहून एकच टाहो फोडला. कुटुंबियांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा थांबत्या थांबत नव्हत्या. स्पप्नील तांदुळकर व जीवन कांबळे या दोन्ही तरुणांच्या अशा या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही तरुणांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

वणी शहर व तालुक्यात अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मालवाहतुकीच्या वाहनांचा सुसाट वेग निष्पाप जीवांच्या मृत्यूचे कारण बनू लागला आहे. एकापाठोपाठ एक अपघात घडू लागल्याने रस्त्यांनी मार्गक्रमण करणारे छोटे वाहनधारक आता चांगलेच धास्तावले आहेत. मालवाहू वाहनांमुळे झालेल्या अपघातात मागील १५ दिवसांत ५ जणांचा बळी गेला आहे. एकाचं सरण विझत नाही तोवर दुसऱ्याचं सरण रचण्याची वेळ या सततच्या अपघातांमुळे येऊ लागली आहे. मालवाहू वाहन चालकांच्या निष्काळजीपणे वाहने चालविण्याला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर बेजाबदारपणे वाहने उभे ठेवणाऱ्यांवरही कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी