बहुजन समाजावर अन्याय होऊनही मौन साधणाऱ्या पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली, माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम
प्रशांत चंदनखेडे वणी
साडेतीन हजार वर्षाची गुलामी तोडून शोषित, पीडित व दीनदुबळ्या घटकांच्या उत्थानासाठी एकाकी लढा देऊन त्यांना समाजात सन्मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांशी व समाजाशी एकनिष्ठ न राहणाऱ्या बहुजन समाजातील काही गद्दारांना व राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून त्यांच्या जागी तडफदार व सामाजहिताचा विचार करणाऱ्या तथा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सामाजिक व राजकीय नेतृत्व सोपविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे परखड विचार बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारताच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतलेले दिल्ली सरकारचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्रपाल गौतम यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच वणी द्वारा आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. इसादास भडके व वामनदादा कर्डक साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. सागर जाधव हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेंद्रपाल गौतम यांनी बाबासाहेबांच्या भारत बौद्धमय करण्याच्या स्वप्नाचा उल्लेख करतांना म्हटले की, बाबासाहेबानंतर बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा कुणी ध्यासच घेतला नाही. सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनीही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गती देण्याचा प्रयत्न केला नाही. धम्मचक्र गतिमान करण्याची जबाबदारी माझ्यानंतर माझे अनुयायी व निष्ठावान कार्यकर्ते घेतील हा विश्वास बाबासाहेबांना होता. पण समाजातील राजकीय व सामाजिक धुरंधरांनी बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यावर कधी भरच दिला नाही. बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती, त्यांनीच दगा केला. बाबासाहेबांनंतर बुद्ध धम्माचा व बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार तीव्रतेने झालाच नाही. समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी आपली वेगवेगळी चूल मांडली. आपल्या सोइ नुसार राजकारण करून समाजाची दिशाभूल केली. परंतु आपण बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा विडा उचलला असल्याचे त्यांनी यावेळी प्रकर्षाने सांगितले. आपण बाबासाहेबांचं कर्तव्यदक्ष लेकरू असून बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध केलेल्या संघर्षाची आपल्याला जाणीव असल्याचेही उद्गार राजेंद्रपाल गौतम यांनी यावेळी काढले. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म वाढविण्यावर आपण लक्ष केंद्रित केलं असून सन २०२५ पर्यंत १० कोटी भारतीयांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. आतापर्यंत ५ लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा संकल्प आपण पूर्ण केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेल्या अधिकार व आरक्षणामुळे बहुजन समाजातील अनेक लोक आमदार, खासदार, मंत्री व देशाच्या सर्वोच्च पदावरही विराजमान झाले. पण सामाजिक विकास त्यांनी साधला नाही. त्यांनी समाज एकत्र आणून बौद्ध धम्माचं अनुकरण करण्यावर भर दिला नाही. समाजबांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला नाही. संविधानाच्या रक्षणाकरिता एकजूट होण्याचीही त्यांची मानसिकता दिसत नाही. देशातील शासकीय मालमत्ता उद्योगपतींना विकली जात आहे. देशात खाजगीकरणाचा सपाटा सुरु झाला आहे. शिक्षण महागडं केलं जात आहे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करण्यात आलं आहे. आरक्षण संपविण्याचा घाट रचला जात आहे. गुलामीकडे वाटचाल सुरु झालेली असतांनाही बहुजन समाजातील आमदार, खासदार व मंत्री आवाज उठवायला तयार नाही. त्यामुळे अशा नेत्यांचा आता हारे तुरे देऊन सत्कार करणं थांबविलं पाहिजे. समाजाची जाणीव नसलेल्यांवर सामाजिक व राजकीय नेतृत्वाची जबादारी न देता निष्ठावान व तडफदार कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे. शिकल्या सवरल्या लोकांनी मला धोका दिल्याची खंत बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. आरक्षणाच्या जोरावर सरकारी नोकऱ्या व आमदार, खासदार व मंत्रिपद मिळालेल्या लोकांनी नंतर सामाजिक बांधिलकी जपलीच नाही. आपले कुटुंब व आपले नातेवाईक यांचाच त्यांनी विचार केला. स्वतःचीच खळगी भरण्यात त्यांनी आपली हयात घालविली. बाबासाहेबांनी माता रमाई व आपल्या मुलांचा विचार केला नाही, व आपलं संपूर्ण जीवन बहुजनांच्या उद्धारासाठी समर्पित केलं. ते ही स्वतःचा व आपल्या परिवाराचा विचार करू शकले असते. पण त्यांनी फक्त नी फक्त समाजाचा विचार केला. सामाजिक समानता निर्माण करतांनाच त्यांनी लोकशाही प्रधान देशाची निर्मिती केली. जनतेला सर्वोच्च स्थानी ठेवले. संपूर्ण विश्वात श्रेष्ठ ठरेल असं संविधान त्यांनी देशाला बहाल केलं. त्याच संविधानामुळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देश एकसंघ आहे. पण आता देशात जातीयतेचा अवडंबर माजला आहे. धर्मनिरपेक्षतेला धोका निर्मान झाला आहे. संविधान बदलण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे बहुजन समाजाने आता एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. आता जर बहुजन समाज जागला नाही तर खूप वेळ झालेली असेल, असे रोकठोक विचार राजेंद्रपाल गौतम यांनी जाहीर व्यख्यान कार्यक्रमात व्यक्त केले.यावेळी प्रा. डॉ. इसादास भडके यांनी बाप्तिस्मा ते धर्मांतर या आपल्या विचार प्रवाहातून धम्म तत्वज्ञानावर प्रकाश टाकला. बुद्ध धम्माचं अनुसरण ही काळाची गरज असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. प्रा. डॉ. सागर जाधव यांनी बाबासाहेबांचा राष्ट्रवाद हा देशाच्या प्रगतीला चालना देणारा होता, हे सांगतानाच त्यांनी लोकशाही प्रधान देशाची संकल्पना मांडतांना बाबासाहेबांनी मानवी मूल्याचं जतन केल्याचं आपल्या भाषणातून उदारणासह पटवून सांगितलं. संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम सरकार कडून केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. बहुजनांनी आपापसातील मतभेद विसरून संविधानाच्या रक्षणाकरिता एकत्र येण्याचं आव्हानही त्यांनी आपल्या भाषणातून केलं. या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment