ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार, वणी मुकुटबन मार्गावरील घटना
प्रशांत चंदनखेडे वणी
कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल ७ मे ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वणी मुकुटबन मार्गावरील क्वालिटी टाईल्स शोरूम जवळ घडली. कोळसा भरलेल्या ट्रकने दुचाकीस्वाराला अक्षरशः चिरडले. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. मृतक हा कोळसा क्षेत्रात कार्यरत असल्याचे समजते. संजय गोयंका वय अंदाजे ५० वर्ष रा. आर. के. अपार्टमेंट चिखलगांव असे या अपघातात दुर्दैवी मुत्यू ओढावलेल्या इसमाचे नाव आहे.
घोन्सा कोळसाखानीतून वेकोलिच्या रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने (MH २९ BE ६१५५) कोलडेपो मधील कामे आटपून घरी जात असलेल्या इसमाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीस्वार ट्रकखाली अक्षरशः चिरडल्या गेला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. चिखलगाव येथील रहिवासी असलेल्या संजय गोयंका या कोळसा क्षेत्रात काम करणाऱ्या इसमाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.कोळसा वाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे अपघातात मोठी वाढ झाली असून अपघातात निष्पाप जीवांचे नाहक बळी जाऊ लागले आहेत. वणी यवतमाळ मार्गावरील राजूर रिंगरोड जवळ कोळसा वाहतूक करणाऱ्या उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून दोन होतकरू तरुण ठार झाल्याची घटना ताजी असतांनाच आज आणखी एका दुचाकीस्वाराचा कोळसा वाहतुकीच्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुदैवी मृत्यू झाला. हा इसम कुटुंबाचा प्रमुख आधार होता. कोळसा वाहतुकीची वाहने कर्दनकाळ ठरू लागली आहे. कोळसा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment