कोळसा व खनिजांच्या वाहतुकीमुळे अपघातात झाली मोठी वाढ, बेशीस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची होऊ लागली आहे मागणी
बेशिस्त वाहतुकीमुळे वणी तालुक्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तालुक्यात कोळसा, डोलोमाइट व लाइमस्टोनच्या खानी असल्याने मुख्य मार्गांनी दररोज शेकडो ट्रक खनिजांची वाहतूक करतांना दिसतात. कोळसाखाणींमुळे मालवाहू वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातल्यात्यात डोलोमाइट, लाइमस्टोन व अन्य गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. प्रमुख रस्ते मालवाहू वाहनांनी नेहमी गजबजलेले असतात. मालवाहू वाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे छोट्या वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत. मालवाहू वाहनांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. काही वाहनचालकांची लापर्वाही निष्पाप नागरिकांच्या जीवावर बितु लागली आहे. वाहनचालकांचे मस्तीत वाहन चालविणे मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या वाहधारकांसाठी आता धोकादायक ठरू लागले आहे. त्यातच बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे मुख्य रस्त्यांवर तासंतास वाहने उभी ठेवली जातात. या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे कित्येक दुचाकीस्वारांचे बळी गेले आहेत. रस्त्यांवर उभी असणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरली असतांनाही अशा वाहनांवर व वाहनधारकांवर कडक कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे वाहनचालक व वाहनधारकांची मनमानी वाढली आहे. मालवाहू वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्याची मागणी आता राजकीय व सामाजिक क्षेत्रातून होऊ लागली आहे.
खनिज संपन्न असलेल्या वणी तालुक्यात खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खनिजांची वाहतूक करणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरू लागली आहे. या वाहनांमुळे कित्येक दुचाकीस्वारांचे अपघात होऊन त्यांचे जीव गेले आहेत. तर अनेकांना अपघातामुळे अपंगत्व आले आहे. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे मागील १५ दिवसांत ५ दुचाकीस्वारांचे अपघात होऊन त्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोळसाखाणींमधून दररोज शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतात. कोळसाखाणींतून जास्तीतजास्त चक्कर लागाव्या म्हणून वाहन चालक सुसाट वाहने चालवितात. तर काही वाहन चालक डिझेल वाचविण्याकरिता न्यूटल करून वाहने चालवितात. त्यामुळे चालकांचे वाहनांवर नियंत्रण रहात नसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. कोळसाखाणींतून कोल वॉशरी व कोल वॉशरीतून रेल्वे सायडिंग अशी देखील कोळशाची वाहतूक सुरु असल्याने प्रमुख रस्ते कोळसा वाहतुकीच्या वाहनांनी नेहमी गजबजलेले असतात. कोल वॉशरी मधून कोळसा सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणारे ट्रक सुसाट धावतांना दिसतात. कोळशाचे वजन काटेही मुख्य रस्त्यालगतच असल्याने वजन करणारी वाहने रस्त्यावरच रांगा लावून उभी असतात. बहुतांश कोळसा वाहतूकदार कंपन्यांचे कॅम्प रस्त्यालगतच असल्याने कोळशाचे ट्रक रस्त्यावरच उभे करून त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यामुळे वाहतुकीस नेहमीच अडथळे निर्माण होतांना दिसतात. वणी यवतमाळ मार्गावर असंख्य कोळशाचे डेपो आहेत. कोळसाखाणींमधून या कोल डेपोमध्येही मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरु असते. त्याचप्रमाणे कोल डेपो मधून अंतर्गत कोळशाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. कोल डेपो मधून कोळसा भरलेलं वाहन कोणत्या बाजूने कधी रस्त्यावर येईल याचा नेम नसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. कमिशन बेसेसवर कोल डेपो मधून ट्रक मालकांना कोळशाचं भाडं मिळवून देणारे अनेक लॉरी सप्लायर लालपुलिया येथे सक्रिय आहेत. त्यांचे ऑफिस देखील मुख्य रस्त्यांवरच असल्याने कोळसा भरून येणारे ट्रक भाडे पावती मिळेपर्यंत रस्त्यावरच उभे असतात. यवतमाळ बायपास मार्गावर निंबाळा फाट्यापर्यंत कोळसा वाहतुकीची वाहने नेहमी रस्त्यावर उभी असलेली पहायला मिळतात.
लालपुलिया परिसर हा कोळसा व्यावसायिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात असंख्य कोल डेपो व कोळशाचे प्रतिष्ठान कोळसा व्यावसायिकांनी थाटल्याचे पहायला मिळतात. त्यामुळे हा परिसर कोळसा वाहतुकीच्या वाहनांनी नेहमी गजबजलेला असतो. बहुतांश कोळसा व्यवसाय हे मुख्य मार्गालगतच असल्याने या ठिकाणी कोळसा भरण्याकरिता येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. कोळसा व्यावसायिकांनी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाच न केल्याने वाहने रस्त्यावरच तळ ठोकून उभी असतात. स्पेअपार्ट्सची दुकाने, वाहनांचे अधिकृत वर्कशॉप, वाहने दुरुस्तीचे छोटे मोठे गॅरेज व टायर पंचर दुरुस्तीची दुकानेही मुख्य मार्गालगतच असल्याने पुरेशा जागेअभावी येथे दुरुस्तीकरिता येणारी वाहने तासंतास रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला नेहमीच अडथळे निर्माण होतांना दिसतात. वणी घुग्गुस मार्ग, वणी वरोरा मार्ग, वणी यवतमाळ मार्ग, वणी घोन्सा मार्ग व वणी मुकुटबन या मार्गांवर कोळसा वाहतुकीच्या वाहनांची नेहमीच रेलचेल पहायला मिळते. या मार्गांवर तासंतास कोळसा वाहतुकीची वाहने उभी असतात. रस्त्यांवर बेजाबदारपणे उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे व सुसाट वाहने चालविण्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत. या मार्गांनी मार्गक्रमण करतांना छोट्या वाहनधारकांचा नेहमी जीव भांड्यात पडलेला असतो. आता तर छोट्या वाहनधारकांनी कोळसा वाहतुकीच्या वाहनांची चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे कोळसा व खनिजांच्या या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी राजकीय व सामाजिक क्षेत्रातून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment