वणी पोलिस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात नागरिकांनीही केलं विक्रमी रक्तदान
प्रशांत चंदनखडे वणी
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम साकारले जात असतांनाच समाजहिताच्या कार्यांनाही चालना दिली जात आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात मनुष्याचं आपल्या प्रकृतीकडे होत असलेलं दुर्लक्ष व शरीराची हवी तशी काळजी घेतली जात नसल्याने मनुष्यांमध्ये विविध शारीरिक व्याधी निर्माण होऊ लागल्या आहेत. काही दुर्धर आजार जडलेल्या व्यक्तींना नेहमी रक्ताची गरज भासते. मानवी जीवनातील बदलामुळेही मनुष्याला अनेक गंभीर आजारांची लागण होऊ लागली आहे. यातील काही आजारग्रस्त रुग्णांना वारंवार रक्त चढवावं लागतं. तसेच अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अपघातात अती रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तींनाही रक्ताची गरज भासत असल्याने रक्त पेढीत पुरेसा रक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे.
याकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकानेच रक्तदान करणं गरजेचं असून रक्तदान शिबिरांचं आयोजन ही एक सामाजिक जबाबदारी झाली आहे. त्यामुळे या सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. त्याच अनुषंगाने काल १६ मे ला वणी पोलिस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिराला वणी व मारेगाव तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पोलिस स्टेशन येथे येऊन रक्तदान केलं. पोलिसांच्या या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान झालं. ११११ रक्तदात्यांनी या शिबिराच्या माध्यमातून आपलं रक्त रक्तपेढीत जमा केलं. शौर्य ब्लड सेंटर यवतमाळ व एकनिल ब्लड सेंटर यवतमाळ येथील चमूंनी रक्त संकलनाचं कार्य पार पाडलं.
एरव्ही कोणत्या ना कोणत्या तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची पावले काल रक्तदान शिबीराकडे वळली होती. पोलिसांनीही रक्तदात्यांसाठी विशेष व्यवस्था केली होती. नेहमी रुबाबदारपणे वागणारे पोलिस काल वेगळ्याच भूमिकेत दिसले. त्यांचा हळवा स्वभाव काल सर्वांना अनुभवायला मिळाला. सर्वांच्याच चेहऱ्यांवर काल प्रेमळभाव दिसत होता. सामाजिक उपक्रम राबविल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत होता. पोलिसांना दादा व भाऊ ही उपाधी दिली जाते. काल पोलिस खरोखरच मित्र व भाऊ बनून नागरिकांची काळजी घेतांना दिसले. पोलिसांचं काल सेवाभावी रूप पहायला मिळालं. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने का होईना पोलिस व जनतेतील सलोखा काल भावुक करणारा ठरला. पोलिसांनाही प्रेमळ मन व भावना असतात, याची प्रचिती काल सर्वांनाच आली. गुन्हेगारांवर वचक रहावी म्हणून पोलिसांना कठोर व्हावं लागतं, पण सामान्य जनतेप्रती त्यांच्या मनात असलेला निर्मळभाव दिसत नसला तरी काही सामाजिक उपक्रमांमधून तो नेहमी झळकत असतो. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने पोलिसांची सौजन्यता प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनाच खुणावत होती.
पोलिसांनी सामाजिक उत्तरदायित्वातून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात ११११ लोकांनी रक्तदान केल्याची प्राथमिक माहिती आहे. हा रक्तदानाचा जिल्ह्यातील विक्रमच म्हणावा लागेल. रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं. रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते शरीरातच तयार होतं. रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये, याकरिता रक्तदानाची नितांत गरज आहे. ज्यावेळी रक्ताचं नातं कामी येत नाही, त्यावेळी आपलं रक्त कामी येतं. आपल्या रक्तामुळे कुणाच्या शरीरात जीव ओतला जाऊ शकतो. आपल्या रक्तामुळे जर कुणाला जीवनदान मिळत असेल तर यापेक्षा मोठं पुण्यकर्म नाही. पोलिसांनी रक्तदानाची असलेली गरज ओळखून रक्तदान शिबीर घेण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला. आणि यवतमाळ नंतर वणीला भव्य रक्तदान शिबीर घेतलं. नागरिकांनीही या शिबिराला भरभरून प्रतिसाद देत विक्रमी रक्तदान केलं. ११११ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केल्याची ही जिल्ह्यातील विक्रमी नोंद आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आलेल्या या शिबिराला उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचं सहकार्य लाभलं. ठाणेदार प्रदीप शिरस्कर, शिरपूर पोलिस स्टेशनचे सपोनि गजानन करेवाड, मुकुटबनचे पोलिस स्टेशनचे सपोनि अजित जाधव, एपीआय माया चाटसे, वणी वाहतूक उपशाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम, डीबी पथक प्रमुख माधव शिंदे, सपोनि प्रवीण हिरे, सपोनि आशिष झिमटे तथा जमादार व सर्व पोलिस कर्मचारी, वाहतूक शाखा व डीबी, एलसीबी पथकाने या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment