वेकोलि प्रशासन उठलं नागरिकांच्या जीवावर, कोळसाखानींमुळे निर्माण झालेल्या समस्या ठरत आहे जीवघेण्या
वेकोलीच्या कोळसाखानींमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याकडे वेकोलि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोळसाखानीलगत वास्तव्यास असलेल्या गावकऱ्यांमध्ये वेकोलि प्रशासनाविरुद्ध कमालीचा असंतोष खदखदत आहे. वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राच्या मुख्य महाप्रबंधकांनी मनमानी धोरण अवलंबिले असून खान बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या कोणत्याही मागण्या ते गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतांना दिसत आहे. मागील काही महिन्यात वेकोलि प्रशासनाच्या सुलतानी धोरणाविरोधात बरेच आंदोलन झाले. पण वेकोलि प्रशासनाचा तोरा मात्र कायम राहिला. कधी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. तर कधी थातुरमातुर आश्वासने देऊन आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्यात आली. लोकप्रतिनिधी व सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही गावकऱ्यांच्या समस्यांना घेऊन वेकोलि विरोधात दंड थोपटावे लागले. पण त्यांच्या इशाऱ्यांनाही वेकोलि प्रशासनाने सहजतेने घेतले. वेकोलि प्रशासनाच्या एकाधिकारशाहीमुळे सारेच हतबल झाले असून वेकोलिच्या तानाशाहीमुळे आत्महत्या कारण्याचा निर्णय घेण्यापर्यंतची वेळ नागरिकांवर आली आहे.
वेकोलिच्या कोळसाखान बाधित क्षेत्रातील गावांना विविध समस्यांनी विळखा घातला आहे. समस्या सोडविण्याकडे वेकोलि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक गावकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या गांभीर्याने घेत नसल्याने गावकरी हतबल झाले आहे. लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यानंतरही खान बाधित क्षेत्रातील समस्या सुटतांना दिसत नाही. वेकोलि प्रशासनाकडे समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांचे केवळ बोळवण केले जात आहे. मागण्यांच्या निवेदनाची वेकोलि प्रशासनाकडून साधी दखलही घेतली जात नाही. खान बाधित रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. छोट्या वाहनधारकांना रस्त्याने मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन निष्पाप जिवं जाऊ लागली आहेत. धूळ प्रदूषणाने शेत पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. वेकोलिच्या बहुतांश कोळसाखाणींमध्ये कोळशाची आवक वाढविण्याकरिता जमीन पोखरली जात आहे. मोठमोठ्या मशिनींच्या सहाय्याने कोळसाखाणींमध्ये उत्खनन करून कोळसा बाहेर काढण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. कोलसखानीच्या उत्खननातून निघणाऱ्या मुरूम व मातीचे कोळसाखानी लगतच ढिगारे करण्यात आले आहे. मुरूम व मातीची डम्पिंग करणाऱ्या ठिकाणी पहाड तयार झाले आहेत. जमिनी पासून किती मीटर पर्यंत मुरूम व माती डम्प करावी याचे नियम बांधून देण्यात आले असतांनाही वेकोलि कडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. नियमबाह्य पद्धतीने मातीचे उंच ढिगारे करण्यात आल्याने कोळसाखान परिसरात नेहमी भूस्खलन होतांना दिसते. त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन मार्गक्रमणाचे रस्ते पूर्णपणे उखडले जातात. या मातीच्या उंच ढिगाऱ्यांमुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह रोखल्या जातो व गावांमध्ये पूर येतात. लाठी येथील शेतकऱ्याच्या शेतात तर या मातीच्या ढिगाऱ्यांना अडणाऱ्या पाण्यामुळे मोठी भेग पडली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे शेती करणे कठीण झाल्याने त्याने ही भेग बुजविण्याकरिता वेकोलिला वारंवार निवेदन दिले. पण त्याच्या निवेदनाची वेकोलिने दखलच न घेतल्याने त्याने अखेर मुख्य महाप्रबंधक कार्यालयातच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा कुठे वेकोलि प्रशासनाला जाग आली, व त्या शेतकऱ्याची जमीन वेकोलि प्रशासनाने लेव्हल करून दिली.
वेकोलिच्या कोळसाखाणींमध्ये मुरूम व मातीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहेत. वेकोलिच्या डम्पिंग यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. झाडाझुडपांचे घनदाट जंगल तयार झाल्याने रानटी जनावरांचा याठिकाणी वावर दिसून येतो. या झुडपांमध्ये काही दिवसांपूर्वी वाघांचाही वावर वाढला होता. वाघांच्या हल्ल्यात येथील नागरिकांचे बळी देखील गेले होते. नागरिकांचे बळी गेल्यानंतर वेकोलिने काही प्रमाणात झाडे झुडपे साफ केली होती. परंतू आता परत झाडाझुडपांचं जंगल तयार होऊ लागलं आहे. वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून येथील रहिवाशांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही गावांचे पुनर्वसनाचे प्रश्नही रखडलेले आहेत. अनेकांना जमिनीचे मोबदले मिळालेले नाहीत. पण वेकोलि प्रशासन मात्र कानावर हात ठेऊन बसले आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही खान बाधित क्षेत्रातील समस्यांना घेऊन वेकोलि विरोधात दंड थोपटावे लागत आहे. तरीही वेकोलि प्रशासन जुमानतांना दिसत नाही. ब्राह्मणी फाटा ते अहेरी (बोरगांव) पर्यंतच्या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याकरिता आमदारांनी वेकोलि प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ब्राह्मणी गाववासीयांनी आंदोलनही केले. पण वेकोलिने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. यावरून वेकोलि प्रशासन एकप्रकारे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. वेकोलि प्रशासनाचा असाच तोरा कायम राहिल्यास नागरिकांचा संयम सुटून ते तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.
Comments
Post a Comment