गोंडबुरांडा येथील नवविवाहित महिलेने केली आत्महत्या, वर्षभराच्या संसारातच तिने केला जीवनाचा शेवट
मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका नवविवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २० मे ला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या महिलेचा गावातीलच युवकाशी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. रिना सुनिल मुसळे (२०) असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
रिनाचा गोंडबुरांडा या गावातील सुनिल नावाच्या युवकाशी प्रेमविवाह झाल्याचे सांगण्यात येते. ती पती सोबत आपल्या सासरी नांदत असतांना अचानक तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्य शेतात गेले होते. ती घरीच होती. या दरम्यान तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सासरची मंडळी शेतातून घरी परतली तेंव्हा त्यांना रिना घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी ही माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रेमातून विवाह बंधनात अडकलेल्या रिनाने टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण रिनाच्या आत्महत्या करण्याने त्यांच्या संसारिक जीवनाचा शेवट मात्र दुःखद झाला. आपल्या पसंतीचा जोडीदार निवडल्यानंतर संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून गेलेल्या रिनाच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment