टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने होत आहे वाहतुकीची कोंडी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी घुग्गुस मार्गावरील टोल नाक्यावर वाहनांच्या नेहमी रांगा लागत असल्याने हा टोल नाका मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. या टोल नाक्यावर पथकर भरणाऱ्या वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत असल्याने या ठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. तासंतास या टोल नाक्यावर वाहतुकीचा जाम लागत असल्याने वाहनधारकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. या टोल नाक्याचं नेहमी एकच टोल काउंटर सुरु रहात असल्याने पथकर भरण्याकरिता वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याची ओरड वाहनधारकांमधून ऐकायला मिळत आहे. शहरालगत असलेला हा टोल नाका हटविण्याची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केली असतांनाही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने पाणी कुठं तरी मुरत असल्याची चर्चा शहरवासियांमधून ऐकायला मिळत आहे. 

वणी घुग्गुस वळण रस्त्यापासून अगदी जवळच आरव्हीसीएल कंपनीने हा टोल नाका उभारला. कोळसाखाणींमधून रेल्वे सायडिंगवर कोळशाची अंतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून पथकर वसुलता यावा या मुख्य उद्देशाने शहराजवळ हा टोल नाका उभारण्यात आला. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या या टोल नाक्यावर नेहमी लांबलचक रांगा लागलेल्या असतात. रेल्वे क्रॉसिंग पर्यंत पथकर भरणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत असल्याने वरोरा टी-पॉईंट पासून शहराकडे वळण घेणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी तर वळण रस्त्यावरच टोल भरणारी वाहने रांग लावून उभी असतात. त्यामुळे शहराकडे वळण घेणाऱ्या वाहनधारकांची मोठी गोची होते. परिणामी वाहनांचा जाम लागून वाहतूक विस्कळीत होतांना दिसते. रेल्वे क्रॉसिंग पासून टोल नाक्याचं अंतर अर्धा किमी पेक्षाही कमी असल्याने रेल्वे गेट बंद होताच टोल नाक्यापासूणही पलीकडे मालवाहू वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची समस्या निर्माण होतांना दिसते. त्याचप्रमाणे टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतुकीची वाहने उभी असतात. टोल नाका परिसर वाहने उभे ठेवण्याचे ठिकाणचं बनले असून वाहतूकदार तासंतास या ठिकाणी वाहने उभी ठेवतात. त्यामुळे वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण होतांना दिसतात. टोल नाक्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे या ठिकाणी दुचाकीस्वारांचे छोटेमोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. 

टोल नाका परिसरात व्यवस्थित साफसफाई देखील करण्यात येत नसल्याने या ठिकाणी कोळशाच्या काळ्या भुकटीचे थर जमा झाले आहेत. या भुकटीवरून वाहने गेल्यास तिचे रूपांतर काळ्या धुळीत होऊन या मार्गावर नेहमी धुळीचं साम्राज्य पसरलेलं दिसतं. या मार्गाने मार्गक्रमण करतांना दुचाकीस्वारांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागतो. हा टोल नाका प्रदूषणवाढ, वाहतूक कोंडी व दुचाकीस्वारांच्या अपघाताचेही कारण बनला आहे. या टोल नाक्यामुळे शेतमाल विक्रीकरिता घेऊन येणाऱ्या वाहनांना शहरातील रस्त्यांनी वाहतूक करावी लागत आहे. त्याचप्रमाणे टोल नाका वाचविण्याकरिता जडवाहतुकीची वाहनेही शहरातील रस्त्यावरून वाहतूक करतांना दिसतात. हा टोल नाका सुरुवाती पासूनच वाहतुकीची समस्या निर्माण करणारा ठरल्याने हा टोल नाका हटविण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली होती. परंतु प्रशासनाने पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखलच न घेतल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये रंगू लागली आहे. टोल नाक्याच्या इमारतीच्या परवानगी बाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मालमत्ता कर न भरल्याचेही सांगण्यात येत होते. नियमबाह्यतेचा ठपका आरव्हीसीएल कंपनीवर ठेवण्यात आलेला असतांनाही हा टोल नाका अद्याप हटविण्यात आलेला नाही, याचेच नवल वाटते. वाहतुकीचा बोजवारा उडविणारा हा टोल नाका शहरापासून दूर हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी