प्रशांत चंदनखेडे वणी
ग्रामपंचायतेच्या मासिक सभेची पूर्व सूचना न देता जाणीवपूर्वक ग्रामपंचायत सदस्याला मासिक सभेतून डावलण्यात येत असल्याची तक्रार राजूर ग्रामपंचायत सदस्य बबिता सिंह यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. बबिता सिंह या राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक ६ मधून निवडून आल्या आहेत. त्या ग्रामपंचायतेच्या सक्रिय सदस्य असून त्यांना ग्रामपंचायतेच्या मासिक सभेची माहितीच दिली जात नसल्याची लेखी तक्रार त्यांनी बीडीओ कडे केली आहे. बबिता सिंह यांना ग्रामपंचायतेच्या मासिक सभेबाबत माहिती न मिळाल्याची ही दुसरी वेळ असून त्यांना जाणीवपूर्वक मासिक सभेतून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्याला मासिक सभेची कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देणे म्हणजे त्याच्या अधिकाराचे हनन करण्यासारखे आहे. बबिता सिंह यांच्या वार्डातील विकासकामे करण्यासंदर्भातही दुजाभाव केला जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ग्रामपंचायतेच्या मासिक सभेची पूर्व सूचना न देता ग्रा.प. सदस्याला जाणीवपूर्वक सभेतून डावलणाऱ्या सरपंच व ग्रामसचिव यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
ग्रामपंचायतेची मासिक सभा घेतांना सर्व सदस्यांना याबाबत पूर्व सूचना देणे अनिवार्य असते. मासिक सभेला ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु बबिता सिंह या ग्रामपंचायतेच्या महिला सदस्याला मासिक सभेची पूर्व सूचना न देता त्यांना सभेतून डावलल्याचा प्रकार एकदा नाही तर दोनदा घडला आहे. २४ मे ला ग्रामपंचायतेची मासिक सभा घेण्यात आली. या सभेची कोणतीही पूर्व सूचना बबिता सिँह यांना देण्यात आली नाही. यापूर्वी देखील घेण्यात आलेल्या मासिक सभेची त्यांना सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंचांकडून माझ्या अधिकाराचे हनन केले जात असल्याचा आरोप बबिता सिंह यांनी केला आहे. बबिता सिंह ज्या वार्डातून निवडून आल्या त्या वार्डातील विकासकामे मंजूर करण्याबाबतही दुजाभाव केला जात आहे. राजूर ग्रामपंचायतेत एकप्रकारे हुकूमशाही पद्धत सुरु असून सरपंच व सचिव मनमर्जीने कामे करतांना दिसत आहे. अशा या ग्रा.प. सदस्याच्या अधिकारांचे हनन करणाऱ्या व हुकूमशहा पद्धतीने ग्रामपंचायतेचा कारभार चालविणाऱ्या सरपंच व सचिवांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी वजा तक्रार राजूर ग्रामपंचायतेच्या महिला सदस्य बबिता सिंह यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
No comments: