निळापूर जवळ कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक समोरासमोर भिडले, एका ट्रकचा चालक गंभीर जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक समोरासमोर भिडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास निळापूर गावालगत असलेल्या संभवनाथ ऑईल मिल जवळ घडली. निळापूर गावाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले व त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमधून ऐकायला मिळत होती. रस्त्यावरील खड्डे अपघाताचे कारण बनू लागले असतांनाही वेकोलि प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे. ब्राह्मणी फाटा ते अहेरी (बोरगाव) पर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्याच्या मागणीला घेऊन नुकतेच ब्राह्मणी गाववासीयांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. परंतु वेकोलिने केवळ आश्वासन देऊन गाववासीयांची मनधरणी केली, व त्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. रस्त्याची दुरुस्ती करण्याचा वेकोलिने कोणताही ठोस निर्णय जाहीर केला नसून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देऊन चालढकल करीत आहे. वेकोलि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे रस्त्यावरील खड्डे आता अपघाताचे कारण बनू लागले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले, व ट्रक अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

निळापूर येथील कोल वॉशरीमध्ये कोळशाची वाहतूक करणारे दोन्ही ट्रक निळापूर गावालगत असलेल्या संभवनाथ ऑइल मिल जवळ समोरासमोर भिडले. केएसटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (MH ३४ BZ १६०९) कोल वॉशरी मधून कोळसा खाली करून येत होता. तर एसव्हीटी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (MH ३४ AV ०८०३) कोळसा भरण्याकरिता कोल वॉशरीमध्ये जात होता. दरम्यान रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कोळसा भरण्याकरिता जाणारा एसव्हीटी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळला. या अपघातात एसव्हीटी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकचा चालक संतोष किसन थाटे वय अंदाजे ४७ वर्ष रा. जैताई नगर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर केएसटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. कोल वॉशरीमध्ये कोळसा भरण्याकरिता भरधाव जात असलेल्या ट्रक चालकाचा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक वरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींमधून ऐकायला मिळत होते. सदर ट्रक हा समोरून येणाऱ्या ट्रकला धडक देत रस्त्यालगत असलेल्या नाल्यात उतरला. केएसटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रक चालकाचे नाव मात्र कळू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु होती. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी