सहा दिवसांपासून बेपत्ता मुलाचा अद्यापही लागला नाही शोध, कुटुंबं आलं धास्तीत


प्रशांत चंदनखेडे वणी 

शाळेच्या सुट्ट्या घालविण्याकरिता वडिलांकडे आलेला मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंब पुरतं हादरलं आहे. घरी करमत नसल्याने आजोबांना वडिलांच्या कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडलेला मुलगा नंतर घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र  शोधाशोध घेतल्यानंतर २२ जूनला वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. सहा दिवस लोटूनही बेपत्ता मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे कुटूंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पंकज संजय केवट (१७) असे या बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

खाजगी वाहन चालक असलेले संजय देवसरन केवट (३९) हे ड्रिमलँड सिटी येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे बल्ला का डेरा जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. ते अनेक दिवसांपासून येथे वास्तव्यास आहेत. अनेक परप्रांतीय वाहन चालक वणी परिसरात वसले आहेत. पण त्यांचा परिवार मात्र मूळ गावीच राहतो. संजय केवट यांचा मुलगा पंकज हा फतेहपूर (उ.प्र.) येथे आपल्या आई सोबत राहतो. शाळेला सुट्ट्या असल्याने तो वडिलांकडे आला होता. २२ जूनला तो घरी करमत नसल्याचे कारण सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. संजय केवट हे कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना मुलगा घरी आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना पंकज कुठे गेला, हे विचारले असता त्यांनी तो तुझ्याकडे जातो म्हणून घरून गेल्याचे सांगितले. पण पंकज हा वडिलांकडे आलाच नसल्याने वडील चिंतेत आले. त्यांनी मुलाचा शोधाशोध सुरु केला. सर्व नातलगांकडे त्यांनी चौकशी केली पण पंकजचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी थेट पोलिस स्टेशनला येऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पण सहा दिवस लोटूनही पंकजचा अद्याप शोध लागला नसल्याने कुटुंबं चिंतेत आलं आहे. संजय केवट यांच्या नातेसंबंधांचा परीघ मोठा असून त्यांचे नातलग राजूर येथेही वास्तव्यास आहेत. काही कारणांमुळे त्यांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला आहे. नात्यांमधील संवादही कमी झाल्याने नातेसंबंध आणखीच ताणले गेले आहेत. त्यामुळे नातलग असूनही ते एकमेकांपासून दूर राहणेच पसंत करतात. पंकज अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे. तो बेपत्ता होऊन सहा दिवस लोटले तरी त्याचा शोध न लागल्याने कुटुंबं धास्तीत आलं आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी