शेतातील किंमती साहित्य चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शेती उपयोगी साहित्याची चोरी करून कास्तकारांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शेतातील किंमती साहित्य चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्याने पोलिसांनी या चोरीच्या घटनांकडे लक्ष केंद्रित केले. शेतातील साहित्यांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा पोलिस कसून शोध घेत होते. पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून शेतातील किंमती साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावला. शेतातील साहित्य चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आधी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांची आज पोलिस कोठडीची मुद्दत संपल्याने त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही आरोपींची जामिनावर सुटका केली आहे.
शेतातील किंमती साहित्याची चोरी करून आधीच आर्थिक डबघाईस आलेल्या कास्तकारांना आणखी आर्थिक विवंचनेत आणणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. वणी तालुक्यातील मोहर्ली येथिल शेतात २ ते ४ मे दरम्यान चोरट्यांनी चोरीचा डाव साधत शेत सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रिंकलरचे तब्बल १४० नोझल लंपास केले. तसेच शेतात जनावरे घुसू नये म्हणून वापरण्यात येणारी झटका मशिनही चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत कास्तकाराने ४ मे ला शेतातील साहित्य चोरीला गेल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी शेतातील साहित्य चोरीच्या घटनेला गांभीर्याने घेत तपास सुरु केला. पोलिस आरोपींचा कसून शोध घेत होते. अशातच पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे चारही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये श्रीकांत पांडुरंग काळे (१९), प्रज्योत देवानंद पाटील (२२) दोघेही रा. राजूर कॉलरी, सचिन राजू वाईकर (२३), मुकेश संजय जोशी (२५) दोघेही रा. गोकुळनगर यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना चोरीच्या मुद्देमालाबाबत विचारले असता त्यांनी चोरी केलेले साहित्य जाकीर हुसेन मुझफ्फर हुसेन या भंगार व्यवसायिकाला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी या भंगार व्यवसायिकाकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी १०२ चोरीचे स्प्रिंकलरचे नोझल जप्त केले आहे. त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ४११ गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, सपोनि आशिष झिमटे, पोलिस शिपाही शुभम सोनुले, सागर सिडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास ना.पो.का पंकज उंबरकर करीत आहे.
Comments
Post a Comment