शेत शिवारात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतमजूराचा मृत्यू , लाठी येथील घटनेची पुनरावृत्ती


प्रशांत चंदनखेडे वणी 

वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका शेत मजुराला आपला जीव गमवावा लागल्याची घटना आज २८ जूनला सायंकाळी ५ वाजता खांदला शेत शिवारात घडली. शेत जमिनीवर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेत मजुराचा जागीच मृत्यू झाला. शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. संतप्त गावकऱ्यांनी शिरपूर वीज वितरणच्या कार्यालयात मृतदेह आणून वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांप्रती आपला रोष व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज तारांच्या दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याने निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. त्यामुळे या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

वणी तालुक्यातील खांदला शेत शिवारात जिवंत विद्युत तारा शेत जमिनीवर पडल्या होत्या. त्या दृष्टीस न पडल्याने शेतात काम करणाऱ्या शंकर केशव दुरूतकर (४९) या शेत मजुराचा जिवंत तारांना स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी शेतातच पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन लाठी येथील पियुष माहुरे हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. या घटनेची शाही वाळत नाही तोच वीज वितरणचा परत गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याने नागरिकांमधून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांप्रती कमालीचा रोष व्यक्त होतांना दिसत आहे. वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे एका शेतमजुराचा जीव गेल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मृतदेह वीज वितरणच्या कार्यालयात आणला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

लाठी शेत शिवारात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन ८ वर्षीय पियुष हा गंभीररीत्या भाजला गेल्याने त्याच्या पायाची दोन बोटं कापावी लागली. २ मे ला ही घटना घडली. या घटनेनंतरही वीज वितरणने आपल्या कामात सुधारणा केली नाही. अखेर त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. यावेळी शेत मजुराला आपला जीव गमवावा लागला, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेत मजुराचा जीव गेल्याने वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी