काय म्हणावं.. नगर पालिकेचा पाणी पुरवठा झाला बेभरवशाचा, पालिकेच्या कारभाराचा उडाला बोजवारा
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या आणखीच गंभीर झाली असून अनिश्चित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून वणी नगरपालीकेचं व्यवस्थापनच बिघडलं असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नगर पालिका प्रशासनाच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचं नियोजनही बिघडलं आहे. पाणी पुरवठ्याचं कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराला ही जबाबदारी पेलणं अवघड जाऊ लागलं आहे. नगर पालिका प्रशासनही कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेवर पांघरून घालण्याचं काम करीत असल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न जटील होऊ लागला आहे. एकूणच नगर पालिका प्रशासनाचं पाणी पुरवठा विभागावर नियंत्रणच न राहिल्याने पाणी पुरवठ्याची समस्या आणखीच गडद झाली आहे. पाणी पुरवठा विभाग व कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरु असून त्यांच्या गलथान कारभारामुळे पाणी पुरवठ्याचा वेळ व काळच निश्चित राहिलेला नाही. तीन दिवसांनी होणारा पाणी पुरवठा कधी चार ते सहा दिवसांनीही होतो. त्यामुळे शहरवासी कमालीचे हैराण झाले आहेत. पाणी पुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या बेजाबदारपणामुळे शहरवासीयांना पाणी समस्येशी झुंजावे लागत आहे. शहरातील प्रत्येक जन अरे ओ ... कधी येईल नळ, हीच विचारणा करतांना दिसतात. पण त्यांना उत्तर मात्र अरेरावीचंच मिळतं. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची चांगलीच वाताहत होऊ लागली आहे. पाण्याच्या समस्येला तोंड देतांना नागरिक बेजार झाले आहेत. पण पाषाणरूपी प्रशासनाला मात्र पाझर फुटतांना दिसत नाही.नगर पालिकेचा पाणी पुरवठा बेभरवशाचा झाला असल्याची ओरड शहरवासियांमधून ऐकायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात पाणी पुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली असून मुबलक पाण्याचे स्रोत असतांनाही शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर पालिका प्रशासन पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्याकडे लक्षच द्यायला तयार नसल्याने पाण्याची समस्या आणखीच बिकट झाली आहे. शहरात साधारणतः तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पण तीन दिवसांनंतरही नळ येतील की नाही याची शहरवासीयांना धास्ती लागलेली असते. पाणी पुरवठ्याचा निश्चित वेळ काळच राहिलेला नाही. कधी चार तर कधी सहा दिवसांनीही पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. पाणी पुरवठा विभागाने बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. शहरवासीयांना ठरलेल्या दिवसांत पाणी पुरवठा करण्याची त्यांना चिंताच राहिलेली नाही. नियोजित वेळेनुसार पाणी पुरवठा करण्याचं गांभीर्यच त्यांना राहिलं नसल्याने शहरातील पाण्याची समस्या सुटता सुटत नसल्याचे पहायला मिळत आहे. पाणी पुरवठा कंत्राटदार निर्धास्त असून तो आपल्या सोइ नुसार पाणी पुरवठा करीत असला तरी त्याचं सगळं फावत आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणाही पालिका खपवून घेत असल्याने त्यांच्यात दिलजमाई असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. अनियमित पाणी पुरवठा होत असतांनाही त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याने कंत्राटदाराची पालिकेत चलती असल्याचे दिसून येत आहे. नागरिक पाण्यासाठी कितीही टाहो फोडत असले तरी कंत्राटदाराला अहो बघाना म्हणण्यापलीकडे नगर पालिका प्रशासनाची बोबडी वळत नाही. नागरिकांकडून बक्कळ कर वसूल केला जातो. पण त्यांना मूलभूत सोइ सुविधा पुरविण्यातही कुचराई केली जाते. ही येथील नागरिकांची व्यथा व शोकांतिका आहे. नगर पालिका प्रशासनाची हीच दुर्लक्षित भावना राहिल्यास नागरिकांचा संयम सुटायला वेळ लागणार नाही, ही चर्चा शहरातून ऐकायला मिळत आहे.
Comments
Post a Comment