जातीय मानसिकतेतून निष्पाप तरुणाचा जीव घेणाऱ्या समाजद्रोह्यांना फाशी द्या, वंचित बहुजन आघाडीचं शासनाला निवेदन
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोंडार या गावातील एका तरुणाची आकसापोटी निर्घृण हत्या करण्यात आली. जातीयवादी मानसिकतेतून या निष्पाप तरुणाचा खून करण्यात आल्याने जनमानसात संतापाची लाट पसरली आहे. या तरुणाने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बोंडार या गावात जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी त्याची अमानुषपणे हत्या केली. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा राज्यभरात तीव्र निषेध केला जात असतांनाच त्याचा खून करणाऱ्या समाजद्रोह्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. मारेगाव तालुक्यातही वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा निषेध नोंदवित तरुणाचा खून करणाऱ्या जातीवाद्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तहसिदारांमार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोंडार या गावात अक्षय भालेराव या तरुणाने घटनाकाराची जयंती साजरी केली. महापुरुषांची विचारसरणी जोपासणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्रात घटनाकाराची जयंती साजरी केल्यानंतर एखाद्याचा जीव घेतला जातो, ही मानवतेला कलंकित करणारी घटना आहे. आजही जातीभेद पाळला जात असल्याचा हा खुला पुरावा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना मानवतेला कलंकित करणाऱ्या घटना देशात घडत आहेत. लोकशाही प्रधान देश घडविणाऱ्या महामानवाची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या तरुणाची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. घटनाकाराची जयंती साजरी करण्याला विरोध करून जातीवादी मानसिकता जोपासली जात असेल तर ही महापुरुषांच्या विचारांची एकप्रकारे विडंबना आहे. धर्मनिरपेक्ष संकल्पना या देशाने स्वीकारली असली तरी जातीवादी मानसिकता मात्र अजून संपली नाही. जातीवादाचा अवडंबर माजविणारे मानवतेला कलंकित करू लागले असून त्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे झाले आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या तरुणाची समाजद्रोह्यांनी निर्घृण हत्या केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून जातीयवादी गुंडांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली आहे. या घटनेचा मारेगावातही निषेध नोंदविण्यात आला असून अक्षय भालेराव याच्या खुन्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम दारुडे यांनी तहसिदारांमार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना वंचितचे तालुका उपाध्यक्ष संजय जीवने, वंचितचे विजय कांबळे,गोरखनाथ पाटील, पंकज झोटिंग, गंगाधर लोनसावळे, रवि वनकर, रमेश चिकाटे, मोरेश्वर खैरे, सुगत जीवने, अनंता खाडे, महेंद्र पाटील, प्रफुल भगत आदी उपस्थित होते.
No comments: