सुवर्ण व्यावसायिकाचे १० लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपींच्या गुन्हे शोध पथकाने आवळल्या मुसक्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका सुवर्ण व्यावसायिकाला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बनाव करून फिल्मी स्टाईल गंडा घालणाऱ्या ठगबाजांना गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून मोठ्या शिताफीने अटक केली. गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेत व्यावसायिकाला ठगविणाऱ्या आरोपींचा शोध लावून त्यांना प्रतापगढ, उत्तर उत्तरप्रदेश येथून अटक केली. सलग दोन गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून फरार आरोपींच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांना चकमा देऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला देखिल गुन्हे शोध पथकाने चपळता पूर्वक माहिती मिळवून नागपूर येथून मोठ्या शिताफीने अटक केली. गुन्हे शोध पथकाने गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा योग्यरीत्या तपास करून शोध लावल्याने त्यांच्या शोध प्रक्रियेची प्रशंसा केली जात आहे. एका वर्षांपूर्वी सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर शहरातील एका सुवर्ण व्यावसायिकाला लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करून गंडा घालण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा छडा लावून १० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपींना अटक केली आहे. अशरद हुसेन उर्फ बबलू उर्फ एसोउद्दीन पुत्र गूलहसन (४३) रा. गोपालपूर, जिल्हा प्रतापगढ उ.प्र., तौसिर अहेमद उर्फ पप्पू वसीम अहेमद (३६) रा. थाहीपूर, ता. राणीगंज, जी. प्रतापगढ अशी या व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
विनोद तुलसीदास खेरा (६२) यांचे शहरात तुलसीदास ज्वेलर्स नावाने दुकान आहे. त्यांच्याकडे काही वडिलोपार्जित सोन्याचे दागिने होते. त्यांना काही कौटुंबिक कार्याकरिता पैशाची आवश्यकता भासल्याने त्यांनी परिचितांकडे वडिलोपार्जित सोन्याचे दागिने विक्री करण्याची चर्चा केली. यातूनच एका परिचिताने सोन्याचे दागिने योग्य भावात खरेदी करणारी तगडी पार्टी आपल्या संपर्कात असल्याचे खेरा यांना सांगितले. नंतर परिचीताच्या माध्यमातून खेरा यांच्याशी व्यवहाराची बोलणी सुरु झाली. खेरा व खरेदीदार सतत एकमेकांच्या संपर्कात राहिल्याने त्यांच्यात व्यवहाराचं गणित जुळलं. दागिन्यांची किंमत ठरल्यानंतर हे दोन्ही ठगबाज १६ ऑगष्ट २०२२ ला वणीला आले. खेरा यांनी त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. त्यांच्या घरीच दागिने खरेदी विक्रीची बैठक पार पडली. खेरा यांनी सोन्याचे दागिने दाखविताच आरोपींनी ते आपल्या ताब्यात घेत खिशात ठेवले. ठरल्या प्रमाणे दागिन्यांची पूर्ण रक्कम बॅगेत असल्याचे सांगत त्यांनी खेरा यांना घराच्या आतील खोलीत नेले. पैसे मोजून घ्या म्हणत बॅग खेरा यांच्याकडे दिली. परंतु बॅगला कुलूप लागले असल्याने खेरा यांनी किल्लीची मागणी करताच आरोपींचा फिल्मी स्टाईल ड्रामा सुरु झाला. आरोपींनी किल्ली कारमध्ये राहिल्याची थाप मारत सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. खूप वेळ पर्यंत दोघेही परत न आल्याने खेरा यांनी घराच्या आजूबाजूला त्यांचा शोध घेतला. पण ते कुठेही आढळून न आल्याने खेरा यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात मिठाचे पॅकेट आढळून आले. खेरा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरळ पोलिस स्टेशन गाठत फसवणुकीची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतांनाच हे प्रकरण गुन्हे शोध पथकाकडे देण्यात आले. गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवीत १० जूनला आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. एकूण १० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची या ठगबाजांनी खेरा यांच्याकडून ठगी केली. त्यांनी लंपास केलेल्या दागिन्यांची माहिती मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, डीबी पथक प्रमुख माधव शिंदे, पोहेकॉ योगेश डगवार, पोना शेख इकबाल, पोना सचिन मरकाम, पोना हरिन्द्रकुमार भारती यांनी केली. पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात एपीआय माधव शिंदे करीत आहे.
Comments
Post a Comment