धारदार तलवारीसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
धारदार तलवार हातात घेऊन परिसरात धुमाकूळ घालीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शस्त्रासह अटक केली आहे. ही कार्यवाही ११ जूनला रात्री १२.२० ते १२.५५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. सपोनि प्रवीण हिरे हे रात्री शहरात गस्त घालत असतांना त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलवारीच्या जोरावर दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याकरिता पोलिस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. पोलिसांनी शहरात रात्रीची गस्तही वाढविली असून गुन्हेगारी कारवाया घडू नये, याकरिता ते नेहमी अलर्ट असतात. शहरातील नटराज चौक येथे एक तरुण हातात तालावर घेऊन परिसरात धुमाकूळ घालत असल्याची माहिती सपोनि प्रवीण हिरे यांना मिळाली. ते पोलिस शिपाई वसीम व श्रीनिवास यांना सोबत घेऊन शहरात रात्रीची गस्त घालत होते. त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना त्याठिकाणी एक तरुण धारदार तलवार हातात घेऊन धुमाकूळ घालतांना दिसला. तलवारीच्या जोरावर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू पाहणाऱ्या सुमित देविदास राखुंडे (२५) रा. नटराज चौक याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, सपोनि प्रवीण हिरे, पो.कॉ. वसिम व श्रीनिवास यांनी केली.
Comments
Post a Comment