कुख्यात गुन्हेगार गब्ब्याची जिल्हा कारागृहात रवानगी, यवतमाळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने काढला होता पळ
प्रशांत चंदनखेडे वणी
पोलिसांच्या तावडीतून चलाखीने पळालेल्या कुख्यात गुन्हेगाराला वणी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अखेर नागपूर येथून मोठ्या शिताफीने अटक केली. अट्टल चोरटा व अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला गब्ब्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. यवतमाळ जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचाराकरिता रुग्णालयात भरती केले होते. उपचारा दरम्यान तेथे तैनात असलेल्या पोलिस शिपायांना चकमा देऊन तो अलगद त्यांच्या तावडीतून पळाला. तेंव्हा पासून पोलिस त्याचा युद्ध पातळीवर शोध घेत होते. वणी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अखेर त्याला टिपले. नागपूर येथे नातेसंबंधातील लग्नाला तो येणार असल्याची खात्रीदायक माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. ही संधी दवडायची नाही, हा निर्धारच गुन्हे शोध पथकाने केला. एपीआय माधव शिंदे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकही नागपूर येथील लग्नात पाहुण्यांच्या वेशात गेलं. आणि त्या लग्नातून गब्याची वरात काढत त्याला त्याच्या खऱ्या सासुरवाडीला (पोलिस स्टेशन) आणलं. त्याची १३ जूनपर्यंत खातिरदारी (पीसीआर) केल्यानंतर त्याची काल कायमस्वरूपी बिदाई (जिल्हा कारागृहात ) करण्यात आली.
गब्ब्या उर्फ मो. नावेद मो. कादिर रा. मोमीनपुरा हा मास्टर माईंड चोरटा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्याची प्रकृती खालावली. त्याला उपचाराकरिता रूग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान तो तेथे तैनात असलेल्या पोलिस शिपायांना चकमा देऊन त्यांचीच दुचाकी घेऊन पळाला. तेंव्हा पासून पोलिस त्याचा युद्ध पातळीवर शोध घेत होते. गब्ब्या याच्या शिरावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानंतर त्याने शहरात चोऱ्यांचा सपाटाच लावला होता. स्थानिक पत्रकार मो. आसिफ शेख यांच्या घरी चोरीचा डाव साधतांना अचानक समोर आलेल्या गब्ब्याने मो. आसिफ शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून त्यांना गंभीर जखमी केले. पत्रकारावरील हल्ल्यानंतर पत्रकार संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. याच प्रकरणात तत्कालीन ठाणेदारांची बदली करण्यात आली. ठाणेदार प्रदीप शिरस्कर हे वणी पोलिस स्टेशनला रुजू झाल्यानंतर त्यांनी परत डीबी पथकाचं गठन करून अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना तुरुंगवारी घडविली.
ठाणेदार वैभव जाधव यांच्या कार्यकाळात डीबी पथकाने गब्ब्याचा पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली होती. चोरीचा माल विक्रीकरिता घेऊन जात असतांना डीबी पथकाने त्याला चोरीच्या मालासह ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयाने गब्ब्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तेथून त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. त्याला परत वणी पोलिस स्टेशनच्याच डीबी पथकाने कौशल्यपूर्ण पद्धतीने शोध लावून अटक केली आहे. त्याची परत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कुख्यात आरोपीला पोलिसांनी सहजतेने घेऊ नये, हा सूर उमटू लागला आहे. १० जूनला पोलिसांनी गब्ब्याला अटक केल्यानंतर १३ जून पर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. काल त्याची नायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.
Comments
Post a Comment