वैभव कोटेक्स जिनिंगला भिषण आग, लाखो रुपयांचा कापूस जाळून खाक
प्रशांत चंदनखेडे वणी
निळापूर-ब्राह्मणी मार्गावरील वैभव कोटेक्स या कापसाच्या जिनिंगला भिषण आग लागून टिनाच्या शेड मध्ये ठेवलेला कापूस जळून खाक झाला. ही घटना आज १४ जूनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत २ हजार क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात जिनिंग मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट आहे.
सूर्य आग ओकू लागल्याने उष्णतेची दाहकता वाढली आहे. उन्हाळ्यात जिनिंगला आग लागण्याच्या घटना घडत असतात. आज वैभव कोटेक्स या कापसाच्या जिनिंगमध्ये अचानक आग लागली. क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. जिनिंग मधिल टिनाच्या शेड मध्ये ठेवलेला कापूस आगीने आपल्या कवेत घेतला. सुमारे २ हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्षस्थानी चढला. जिनिंग मधील कर्मचाऱ्यांनी समय सूचकता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याच्या मशीनचा मारा केल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. अग्निशमनदलही अतिशीघ्र घटनास्थळी पोहचल्याने आग नियंत्रणात आली. अन्यथा आणखी मोठे नुकसान झाले असते. आग नेमकी कशामुळे लागली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Comments
Post a Comment