शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर, तरीही कंत्राटदार खंबीर... हे कोडं सुटेल काय हो !
प्रशांत चंदनखेडे वणी
नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील पाण्याची समस्या आणखीच बिकट होऊ लागली आहे. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा कंत्राटदारापुढे एकप्रकारे नांगी टाकल्याचे चित्र दिसून येत आहे. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासन मात्र हतबल झालं आहे.
शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणखीच गंभीर बनला असून पाण्याअभावी नागरिकांचे बेहाल होतांना दिसत आहे. शहरात तीन, चार तर कधी पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. नागरिक नळ येण्याची चातकासारखी वाट बघत असतात. पाणी पुरवठा होणाऱ्या दिवसावर तर नळाच्या पाण्याकडे सर्वांच्या नजारा लागलेल्या असतात. शहरातील काही भागात रात्रीला नळ सोडले जात असल्याने लोकं नळाच्या पाण्याकडे टक लावून असतात. पण रात्रभर जागूनही नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचा चांगलाच मनस्ताप होतांना दिसतो. आज नळाचा दिवस असतांनाही नळाला पाणी न आल्याने नागरिकांची घोर निराशा झाली. पाणी पुरवठा कंत्राटदारासमोर प्रशासनही थिटं झाल्याचं पहायला मिळत आहे. पाणी पुरवठा कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरु असतांनाही पालिकेचा अधिकारी वर्ग ब्र शब्द काढायला तयार नाही. यावरून किती हितसंबंध जपले जातात याचा परिचय येतो. शहरात पाणी पेटलं असतांनाही सर्वांनीच चुप्पी साधली आहे. लोकप्रतिनिधीही अनियमित पाणी पुरवठ्याचा हा विषय गंभीरतेने हाताळतांना दिसत नाही. शहरात पाणी पुरवठ्याच्या समस्येला घेऊन रान उठलं असतांनाही लोकप्रतिनिधींपर्यंत मात्र या समस्येची धग अजूनही पोहचलेली दिसत नाही. शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली असतांनाही लोकप्रतिनिधी पाणी पुरवठ्याच्या समस्येचं मूळ शोधून शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटविण्याची नैतिक जबाबदारीही पार पाडतांना दिसत नसल्याचा घणाघाती आरोप मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केला आहे.
शहरात पाणी पुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तीन ते चार दिवसांआड शहरात पाणी पुरवठा केला जातो. त्यातही नळ येतील की नाही याची शाश्वती नसते. शहरवासीयांना मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठा कंत्राटदार मनमर्जीने शहरात पाणी पुरवठा करतांना दिसत आहे. कंत्राटदारावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. नगर पालिका प्रशासनाने तर पाणी पुरवठा कंत्राटदारासमोर एकप्रकारे नांगी टाकल्याचे दिसून येत आहे. शहरात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. काही परिसरातील मलयुक्त पाणी सरळ नदीत जात असून तोच पाणी पुरवठा शहरवासीयांना केला जात आहे. अनेक वर्षांपासून नगर पालिकेचे जल शुद्धीकरण यंत्र बंद आहे. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीतील घाण मिश्रित पाण्याचा पुरवठा शहरवासीयांना केला जात आहे. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ते केवळ कारणमीमांसा करण्यातच धन्यता मनात आहे.
रस्त्यांची कामे आधी, पाणी पुरवठ्याचं बघू कधी, हे धोरण सध्या शहरात अवलंबिलं जात आहे. मुबलक पाण्याचे स्रोत असतांनाही शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरात अक्षरशः पाणी पेटलं आहे. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे. नगर पालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा कंत्राटदार पाणी पुरवठ्याची जबादारी पेलण्यास असमर्थ ठरू लागला असतांनाही नगर पालिका प्रशासन त्याच्यावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या पैशातून कंत्राटाचा आर्थिक लाभ घेत असलेला हा कंत्राटदार जनतेशीच उर्मटपणे बोलतो. पाणी पुरवठ्याबाबत विचारणा केली असता सीईओला विचारा अशी अरेरावीची उत्तरे देतो. तरीही त्याच्यावरच विश्वास दर्शविला जातो, याला काय म्हणावं हेच कळत नाही. लोकप्रतिनिधीही शहरात अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठा होत असतांना कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य, ही अतिशय गंभीर बाब असतांनाही लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करून आपली नैतिक जबाबदारी झटकत असल्याचा आरोप मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आज वाढीव दिवसाचा जश्न सुरु असतांना जनता मात्र तहानली होती, हेच काय ते सुशासन हा प्रश्नही या निमित्ताने चर्चेत आला होता.
Comments
Post a Comment