काय सांगता... खाजगी मालकी हक्काच्या जागेवर ग्रामपंचायत बांधणार होती पाण्याची टाकी !
प्रशांत चंदनखेडे वणी
ग्रामीण भागात सध्या विकास कामांची रेलचेल सुरु असून गाव पातळीवरील विकास कामांसाठी शासनाकडून मुबलक निधी देण्यात आला आहे. काही गावांमध्ये दर्जेदार कामे केली जात असून काही गावांमध्ये मात्र दर्जाहीन कामे करून टक्केवारी लाटली जात आहे. मनरेगा अंतर्गत रस्ते व नाल्यांची कामे गाव खेड्यात धडाक्यात सुरु असून ही कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची होत असल्याची ओरड गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. काही गावांमध्ये मध्ये तर जेथे गरज नाही, तेथेही नाल्या बांधून शासनाचा निधी उधळण्यात आल्याचे दिसून येत आहे. वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाघदरा ग्रामपंचायतेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचा दर्जा खालावला असल्याची ओरड गाव वासीयांमधून ऐकायला मिळत आहे. एवढेच नाही तर वाघदरा ग्रामपंचायतने शासनाच्या निधीचीही मोठ्या प्रमाणात उधळण केल्याचे दिसून येत आहे. गावात जल जिवन मिशन योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु असून पाण्याची टाकी उभारण्याकरिता वयक्तिक मालकी हक्काची जागा निवडण्यात आली. या जागेवर बोरही मारण्यात आला. खड्डे खोदून पिल्लरही उभे करण्यात आले. जवळपास पाण्याच्या टाकीचं फाउंडेशन पूर्ण झालं असतांनाच जागा मालकाने बांधकामाबाबत हरकत घेतली. ग्रामपंचायतेला नोटीस पाठवून टाकी उभारण्याचं काम बंद पाडलं. ग्रामपंचायत सरपंच, सचिवांना वयक्तिक व ग्रामपंचायतेच्या मालकी हक्काची जागाही माहिती नसल्याने टाकीच्या प्राथमिक बांधकामावर खर्च झालेला निधी व्यर्थ गेला आहे. तो भरून काढण्याकरिता ग्रामपंचायत व कंत्राटदार काय युक्ती लढवतील, ही जोरदार चर्चा गावात रंगली आहे. कंत्राटदार कमी प्रतीचं मटेरियल वापरून मिळालेल्या कंत्राटाच्या रक्कमेत समतोल साधेल की, टक्केवारीत समझोता होईल या चर्चांना गावात उधाण आले आहे.
वाघदरा ग्रामपंचायत विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहिली आहे. सदस्यांच्या अपात्रतेचा विषय असो की, मुरूम उत्खननाचा, खाजगी ले-आऊटला पाणी पुरवठा करण्याचा विषय असो की, काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नालीच्या बिलाचा, ग्रामपंचायतेचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन ते तीन वर्षाच्या कार्यकाळात कोणताही ग्रामसेवक अधिक काळ टीकल्याचे जाणवत नाही. लोकप्रतिनिधी दाबतंत्राचा वापर करून मनमर्जी कामे करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील कामकाजाकडे सहसा वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत नसल्याने लोकप्रतिनिधी व लोकसेवकाचं चांगलंच फावत आहे. आपसी तडजोडीमुळे गावातील विकास कामांचा दर्जाचं तपासाला जात नसल्याची चर्चा गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जी.प.पाणी पुरवठा विभाकडून मिळालेल्या निधीतून वाघदरा या गावात पाण्याची टाकी बांधली जात आहे. ही टाकी बांधण्याकरिता आधी ग्रामपंचायतेने निवडलेली जागा खाजगी मालकीची निघाल्याने जागा मालकाने ग्रामपंचायतेला नोटीस देऊन बांधकाम बंद पाडलं. या ठिकाणी बोर व खड्डे खोदून पिल्लर उभे करण्यात आले होते. पाण्याच्या टाकीचं फाउंडेशन जवळपास पूर्ण झालं होतं. पण न्यायालयीन वादात असलेली ही जागा वयक्तिक मालकीची निघाल्याने ही पाण्याची टाकी आता ग्रामपंचायत जवळ बांधण्यात येत आहे. दरम्यान टाकीच्या प्राथमिक बांधकामावर खर्च झालेल्या निधीचं काय, हा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे. हा खर्च भरून काढण्याकरिता पाण्याच्या टाकीचं बांधकाम निकृष्ठ दर्जाचं तर करण्यात येणार नाही ना, ही चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली आहे. ग्रामपंचायतेने जागेची निवड करतांना पूर्ण शहानिशा करायला हवी होती. पण ग्रामपंचायत हद्दीतील जागेची पुरेपूर माहिती नसलेल्या लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकाने खाजगी जागेवर पायवा रचल्याने शासनाचा लाखोंचा निधी उधळला गेला आहे. यावर आता काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गावात आधीच एक पाण्याची टाकी असून जवळपास १५ वर्षांपूर्वी या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून या टाकीतून पाण्याचा पुरवठा बंद आहे. ही पाण्याची टाकी जीर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. १५ वर्षातच दुसरी टाकी बांधण्याची वेळ आल्याने आता तरी टाकीचे दर्जेदार बांधकाम होईल काय, हा प्रश्न गावासीयांमधून उपस्थित होऊ लागला आहे. या टाकीच्या देखभाल व दुरुस्तीवर वेळोवेळी निधी खरचण्यात आला. पाणी पुरवठा बंद असतानाही टाकीच्या देखभाल व दुरुस्तीच्या नावावर आपले हीत साधण्यात आले. ग्रामपंचायतेने जनतेचा पैसा व शासनाचा निधी उधळण्यात कोणतीच कसर सोडली नाही. ग्रामपंचायतेचा पूर्णतः मनमर्जी कारभार सुरु असल्याची ओरड नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. विकास कामांसाठी निधी मिळाला म्हाणून निधीची अनावश्यक उधळण करणं कितपत योग्य, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment