विरकुंड ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू विक्रीला उधाण, सरपंच व गावकऱ्यांनी आमदारांना घातले साकडे
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील विरकुंड या गावासह डोंगरगाव व दहेगाव या गावांमध्ये अवैध दारू विक्रीला उधाण आलं असून गावात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री केली जात आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी गावात आपले ठिय्ये मांडले आहेत. कुणालाही न जुमानता ते अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. गावातच दारू मिळत असल्याने युवावर्ग व्यसनाधीन होऊ लागला आहे. मजूरवर्गही व्यसनेच्या आहारी गेला आहे. मजूर हे मजुरीला न जाता नशेत तर्रर्र राहतांना दिसत आहेत. गावातील पुरुष मंडळी दारूच्या आहारी जाऊ लागल्याने त्यांचं संसारिक जीवन विस्कळीत होऊ लागलं आहे. कामगार व मजुरांची मिळकत दारूचे व्यसन भागविण्यात खर्ची होत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदर्निवाहाचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गावांमध्ये राजरोसपणे सुरु असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याकरीता विरकुंड ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व गावकऱ्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले. त्यांनी आमदारांना निवेदन देऊन अवैध दारू विक्रीला पायबंद लावण्याची मागणी देखील केली.
विरकुंड, डोंगरगाव व देहेगाव या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूर, खाजगी नोकरदार व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून गावात सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे हा वर्ग व्यसनाधीनतेकडे वळू लागला आहे. गावातच मुबलक दारू मिळत असल्याने गावात तळीरामांची संख्या कमालीची वाढली आहे. कास्तकारांनाही दारूचं व्यसन जडल्याने त्याचा शेतीच्या कामांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. शेतमजूरही दारूच्या आहारी जाऊ लागल्याने त्यांच्या व्यसनाचा कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. खाजगी नोकरदार वर्गही कामावर न जाता नशेत तर्रर्र होऊन घरीच लोळत असल्याने कौटुंबिक कलह वाढू लागला आहे. घरून कामावर जाण्याकरिता निघालेली माणसे दारू पियुन गावातच गोंधळ घालू लागल्याने गावातील वातावरण बिघडू लागले आहे. आपली मिळकतही ते दारूची तलब भागविण्याकरिता खर्च करू लागल्याने त्यांच्या संसारिक जीवनाचं गणित बिघडू लागलं आहे. त्यांच्या व्यसनाधीनतेमुळे नेहमी पारिवारिक कलह निर्माण होऊन त्यांचे संसार उद्धवस्त होऊ लागले आहे. दारूच्या अती सेवनाने कित्येकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. अवैध दारू विक्रेत्यांची गावात मुजोरी वाढली असून ते कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी गावांमध्ये ठिकठिकाणी आपले ठिय्ये तयार केले आहेत. गावांमध्ये अवैध दारू विक्रीचा महापूर वाहत असून या अवैध दारू विक्रीला पायबंद लावण्यास संयोग करण्याची मागणी विरकुंड ग्रामपंचायतचे सरपंच कविता सोयाम, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बांदूरकर, ग्रामपंचायत सदस्य तथा गावकऱ्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर ३२ गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment