रस्ते दुरुस्तीसाठी कुठे घालावं लागतं लोटांगण तर कुठे करावं लागत आहे रस्ता रोको आंदोलन


प्रशांत चंदनखेडे वणी 

रस्ते विकासाकरिता कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात आला असतांनाही रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना अद्यापही वेग आलेला दिसत नाही. शहरातील अंतर्गत व काही प्रमुख रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. ग्रामीण भागाकडे जाणारे रस्तेही रहदारीयोग्य राहिलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्तीच्या मागणीला घेऊन रखरखत्या उन्हात जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागत आहे. भालर ते तरोडा या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीला घेऊन १६ जूनला पाच ते सहा गावातील नागरिकांनी भालर रोडवरील भूमी पार्क गेटजवळ भर उन्हात रस्ता रोको आंदोलन केले होते. तर तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याच्या मागणीला घेऊन काल एका वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याने अक्षरशः रस्त्यावरच लोटांगण घातले. तहसिल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्याची त्यांची अनेक दिवसांची मागणी आहे. त्यांनी या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याकरिता प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहारही केला. २०२१ पासून सतत ते या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. पण प्रशासनाने त्यांच्या मागणीला गांभीर्याने न घेतल्याने हा सामाजिक कार्यकर्ता काल रस्त्यावरच उपोषणाला बसला. एवढेच नाही तर तपत्या उन्हात रस्त्यावर लोटांगण घालून त्यांनी रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. हा रस्ता पूर्णतः उखडला असून केवळ नावालाच हा रस्ता शिल्लक राहिला आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व  न्यायालय याच रस्त्यावर असल्याने दररोज शेकडो नाहारीकांचं या रस्त्यानं जाणं येणं सुरु असतं. दुचाकी व चारचाकी वाहनांचंही या रस्त्याने सतत जाणं येणं सुरु असतं. एवढेच नाही तर कार्यवाही केलेली रेती व कोळशाची जड वाहनेही याच रस्त्याने आणून कार्यालयांपुढे लावली जातात. या रस्त्याचे पक्के बांधकामच करण्यात न आल्याने हा रस्ता अतिक्रमणाने वेढल्या गेला आहे. रस्त्याच्या आजूबाजूला चाय टपरी व पानठेले लावण्यात आल्याने हा रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. या रस्त्यावर डांबर तर उरलेच नाही, केवळ रस्त्याचा आकार उरला आहे. हा रस्ता रहदारीयोग्यच राहिलेला नाही. या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. प्रमाणपत्र व दाखले तयार करण्याकरिता दररोज शेकडो नागरिक प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवितात. तसेच समस्या, तक्रारी व मागण्या घेऊनही अनेक जन प्रशासकीय कार्यालयांमध्ये येतात. राजकीय नेते व सामाजिक पुढारीही आपल्या मागण्यांची निवेदने देण्याकरिता नेहमी प्रशासनाकडे धाव घेतात. पण येथे दिव्याखालीच अंधार दिसून येत आहे. प्रशासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्याचीच पुरती वाट लागली आहे. शहरातील समस्यांचं निराकरण करण्याची अपेक्षा ठेऊन सर्वच प्रशासनाकडे धाव घेतात. पण प्रशासकीय कार्यालयाकडे जाणारा रस्ता मात्र आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे. या रस्त्याचे बांधकाम करण्याची कुणी तसदीच घेतली नाही. सामाजिक कार्यकर्ते दादाजी पोटे यांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळोवेळी मागणी करून प्रशासनाकडे पाठपुरावाही केला. पण प्रशासनाने त्यांची मागणी गांभीर्याने घेतली नाही. शेवटी दादाजी पोटे यांनी काल या रस्त्यावरच उपोषण मांडले. रखरखत्या उन्हात रस्त्यावर त्यांनी अक्षरशः लोटांगण घातले. समस्या सोडविण्याकरिता नागरिकांना आता प्रशासनापुढे लोटांगण घालावं लागत असल्याने शहरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. 

१६ जूनला भालर ते तरोडा या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याच्या मागणीला घेऊन बेसा, लाठी, निवली, तरोडा, निलजई व बेलोरा गाववासीयायांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. भर उन्हात शेकडो महिला आपल्या चिल्या पिल्यांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अबाल वृद्ध व लहान मुलंही या आंदोलनात दिसून आले. उन्हाचे चटके सोसून रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या महिला व लहान मुलांची कुणी कीव केली नाही. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या आंदोलनाकडे पाठ फिरविली. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अधिकारी आंदोलकांशी निरर्थक चर्चा करीत होते. ते वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून आंदोलकांना त्यांचा संदेश कळवीत होते. सकाळी ११ वाजता पासून तर दुपारी ४ वाजेपर्यंत महिला व अबाल वृद्धांसह नागरिक उन्हात भाजत होते. पण त्यांना ठोस आश्वासन देण्याचंही कुणी सौजन्य दाखविलं नाही. शेवटी संपूर्ण ऊन अंगावर घेतल्यानंतर त्यांना रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन देण्यात आले. 

भालर ते तरोडा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्याने दुचाकी चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. तरोड्यावरून भालर मार्गे वणीला येणारा हाच प्रमुख मार्ग असल्याने या मार्गाने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. कास्तकारांना शेती उपयोगी साहित्य व वस्तू खरेदी करण्याकरिता वेळोवेळी वणीला यावं लागतं. परंतु रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यांना मार्गक्रमण करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे त्यांचं रस्त्याने मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. आता काही दिवसांतच शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना या खड्डेमय रस्त्यावरून जाणं येणं करतांना मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी रेटून धरली होती. पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सहाही गावांमधील नागरिकांना भर उन्हात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी