आरोपीच्या अटकेत बाधा आणून त्याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या आई व पत्नीवर गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
बिनाजमानती वारंट मधील फरार आरोपींची वणी पोलिसांकडून शोध मोहीम राबवून त्यांची धरपकड केली जात आहे. या मोहिमे अंतर्गत १८ ते १९ जून च्या मध्यरात्री दरम्यान मारेगाव येथे रहात असलेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्याकरिता गेलेल्या पोलिसांशी आरोपीच्या आई व पत्नीने हुज्जत घालून त्याला मागच्या दारातून पळून जाण्यात मदत केल्याने दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात वणी पोलिस स्टेशन येथे प्रलंबित बिनाजमानती वारंट मधील फरार आरोपींचा शोध लावून त्यांना अटक करण्याची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत पोना मुकेश करपते, पोना अजित पंधरे व पोकॉ श्रीनिवास गोनलवार यांचं पथक तयार करून १८ ते १९ जूनच्या मध्यरात्री मारेगाव येथे रहात असलेल्या फरार आरोपीच्या शोधात पाठविण्यात आलं. आरोपी राजू शंकर भुजाडे याचा शोध घेऊन पोलिस त्याला अटक करण्याची कार्यवाही करीत असतांनाच आरोपीची आई व पत्नी मधात आली. या दोघींनीही पोलिसांशी हुज्जत घालून आरोपीच्या अटकेत बाधा निर्माण केली. या दरम्यान आरोपी मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाला. फरार आरोपीला अटक करण्यात बाधा निर्माण करणे व आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याने या दोन्ही महिलांवर भादंवि च्या कलम २२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment