काय सांगता... वेकोलिच्या रेल्वे सायडिंगचं नियोजनच बिघडलं, कोळशाच्या साठवणुकीचे निर्माण झाले प्रश्न !


प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या कोळसाखाणींमधून वणी रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या मुख्य मार्गांवर लांबचलांब रांगा लागत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा होतांना दिसत आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टोल नाक्याच्याही पलीकडे ब्राह्मणी फाट्यापर्यंत रांगा लागताना दिसत आहे. आज तर घुग्गुस मार्गाबरोबरच वरोरा मार्गावर हनुमान मंदिरापर्यंत कोळसा वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांचा जाम लागल्याने वाहनधारकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसला. 

वेकोलिच्या वणी रेल्वे सायडिंगवर कोळसा साठवणुकीची क्षमताच राहिली नसल्याचे कोळसा वाहतूकदार कंपन्यांच्या मालकांचे म्हणणे आहे. कोळसा सायडिंगवर कोळसा खाली करण्याकरिता जागा नसल्याने मुख्य मार्गांवर एक ते दीड किलोमीटर पर्यंत ट्रकांच्या रांगा लागल्या आहेत. वेकोलिच्या रेल्वे सायडिंगचे प्रमुख असलेले श्रवण कुमार यांच्या नियोजनबद्धतेच्या अभावामुळे कोळशाच्या साठवणुकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परिणामी मुख्य मार्गांवर कोळसा वाहतुकीच्या ट्रकांच्या लांबचलांब रांगा लागताना दिसत आहे. वेकोलिच्या कोळसा सायडिंगवरून मालवाहू रेल्वेची वाहतूकही मंदावली असल्याने सायडिंगवर कोळशाचा स्टॉक प्रचंड वाढला आहे. आधी दिवसांतून चार ते पाच रॅक कोळसा भरून निघायच्या आता तीन ते चार रॅकही बरोबर निघत नसल्याने कोळसा साठवणुकीचं नियोजन बिघडलं आहे.

वेकोलिच्या वणी रेल्वे सायडिंगवर उकनी, कोलार, घोन्सा व मुंगोली या कोळसाखाणींमधून सध्या कोळसा वाहतुकीचं कंत्राट देण्यात आलं आहे. चारही कोळसाखाणींमधून मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरु आहे.  कोळसा सायडिंगवर कोळशाची प्रचंड आवक वाढल्याने कोळसा साठवणुकीसाठी जागा कमी पडू लागली आहे. अशातच सायडिंगवर कोळशाच्या रॅक लागण्याचं प्रमाणही कमी झाल्याने कोळसा खाली करण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कोळसाखाणींमधून कोळसा भरून येणारे ट्रक मुख्य रस्त्यांवरच रांग लावून उभे राहतांना दिसतात. मुख्य रस्त्यांवर रांगा लावून उभ्या राहणाऱ्या कोळशांच्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. मुख्य मार्गांवर वाहनांचा जाम लागताना दिसत आहे. वेकोलिच्या रेल्वे सायडिंग व्यवस्थापकांच्या नियोजनशून्यतेमुळे मुख्य मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आहे. वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातील कोळसाखाणींमधून कोळशाचा साठा करण्याची क्षमता असलेल्या वणी रेल्वे सायडिंगवर मुंगोली कोळसाखाणीतूनही कोळशाची वाहतूक केली जात असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे बोलल्या जात आहे. मुंगोली कोळसाखाणीतून मोठ्या प्रमाणात कोळसा आणला जात असल्याने कोळसा साठवणुकीची समस्या निर्माण झाली आहे.

वेकोलिच्या रेल्वे सायडिंगवर अंदाजे ५६ हजार टन कोळशाचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. कोळसा खाली करण्याकरिता जागा राहिली नसल्याने कोळशाचे ट्रक तासंतास मुख्य रस्त्यांवर उभे राहतांना दिसत आहे. कोळसा वाहतूदरांना कोळशाचे ट्रक खाली कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. एक तर आधीच सायडिंग ओबडधोबड असल्याने ट्रक खाली करतांना मोठी जोखीम पत्करावी लागते. आता तर अत्यंत कमी जागेत ट्रक चालकांना जीवावर उद्धार होऊन ट्रक खाली करावे लागत आहे. जोखीम पत्करून ट्रक खाली करण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी होऊ लागल्याने वाहतूकदार कंपन्यांनी आता सायडिंगवर कोळशाची वाहतूकच न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक तर आधीच कोळसाखाणींकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा आणि त्यात रेल्वे सायडिंगवरील नियोजनाचा अभाव यामुळे ट्रकांचे प्रचंड नुकसान होऊ लागल्याच्या प्रतिक्रिया ट्रक मालकांनी व्यक्त केल्या आहे. वेकोलिच्या ढेपाळलेल्या कारभाराचा फटका कोळसा वाहतूकदारांबरोबरच मुख्य मार्गावरील वाहतुकीलाही बसू लागला आहे. रेल्वे सायडिंगवरील कोळसा वाहतुकीची समस्या न सुटल्यास रस्त्यांवर रांगा लावून राहणाऱ्या वाहनांमुळे अपघात व नागरिकांचा संताप अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी