पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लोकशाही मार्गाने केली देशाने प्रगती... केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव
प्रशांत चंदनखेडे वणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास साधला असून देशातील प्रत्येक घटकापर्यंत सोइ सुविधा व शासकीय योजना पोहचविण्याचं काम केलं आहे. प्रत्येक जाती धर्मातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विकासात्मक कामांकरिता निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही. लोकशाही मूल्यांचं संवर्धन करून लोकशाही मार्गाने जनतेच्या मूलभूत अधिकारांचं जतन करण्याचं काम मोदी सरकारच्या काळात झालं आहे. देश लोकशाही मार्गाने प्रगती करीत असतांना विरोधक मात्र निरर्थक आरोप करून प्रगतीत बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पाच आर्थिक प्रगत देशात भारताची तुलना होऊ लागली आहे. अमेरिकेने भारताशी मैत्रीचे संबंध दृढ केले आहे. ९ वर्षात मोदी सरकारने देशाला प्रगती पथावर आणले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम १९७४ मध्ये काँग्रेसच्या राजवटीत झालं होतं. २५ जून हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं टीकास्त्र सोडतानाच विरोधी पक्षाच्या एकजुटीलाही खंबीरपणे सामोरे जाऊन विजय साकार करण्याचा आशावाद व्यक्त करतांनाच पक्षाच्या सातही मोर्चांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घराघरापर्यंत पोहचून केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनांची माहिती देत ५१ टक्के मतदान आपल्या पारड्यात पाडून घेण्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री (कामगार व रोजगार तथा पर्यावरण व वन) भूपेंदर यादव यांनी केलं. भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या संयुक्त मोर्चा संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूपेंदर यादव यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भाजपाच्या नेते मंडळींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा तपशील देत वणी विधानसभा क्षेत्रासाठीही केंद्राने भरपूर निधी दिल्याने विकासकामांना गती मिळाल्याचे सांगितले. पिण्याचे स्वच्छ पाणी गावागावांत पोहचविण्याबरोबरच शहर व तालुक्यात रस्त्यांचं जाळं विणण्याचं काम केंद्र सरकारच्या मदतीने आपण केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा आपला उद्देश आपण साध्य केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शहरात ठिकठिकाणी बगीचे तयार केले. अनेक कल्याणकारी योजना वणी विधानसभा क्षेत्रात राबविल्या. जनतेचं हित हीच आपल्या कामाची रीत राहिल्याचं त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. त्यांनी रहिवासी वस्तीलगत व मुख्य मार्गांवर असलेल्या कोळसा सायडिंगमुळे होणाऱ्या प्रदूषणाला हात घालत या कोळसा सायडिंग माईन्स क्षेत्रात हलविण्याकरीता सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी मंत्री महोदयांकडे व्यक्त केली.
यावेळी भाजपचे निष्ठावान नेते हंसराज अहिर व संजय कुटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दिनकर पावडे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीची वैशिष्टे आपल्या मनोगतातून व्यक्त केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याचे संकेत असल्याने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे निर्देशही त्यांनी आपल्या भाषणातून दिले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment