विजेच्या लपंडावाने शहरातील नागरिक त्रस्त, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याकडे वीज वितरण कंपनीचे होऊ लागले दुर्लक्ष
प्रशांत चंदनखेडे वणी
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या विजेच्या लपंडावाने शहरवासी कमालीचे वैतागले आहेत. दिवसातून अनेकदा वीज प्रवाह खंडित होत असल्याने उष्णतेमुळे घरातही नागरिकांचे बेहाल होतांना दिसत आहे. दिवसभर तर विजेचं जाणं येणं सुरुच असतं. पण रात्री अपरात्रीही विजेचा लपंडाव सुरू रहात असल्याने नागरिकांची झोपमोड होऊन त्यांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे. वीज पुरवठा केंव्हा व कधी खंडित होईल याची जराही शाश्वती राहिलेली नाही. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरवासियांना अघोषित लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याची तसदीच वीज वितरण कंपनी घ्यायला तयार नसल्याचे एकूणच चित्र शहरात पहायला मिळत आहे. विजेचा लपंडाव हा नेहमीचाच झाल्याने वीज बेभरवशाची झाली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या रोषाचे कारण बनू लागला आहे. शहरातील काही भागात तर अतिशय कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. विजेचा दाब (व्होल्टेज) अतिशय कमी रहात असल्याने घरातील विजेची उपकरणेही व्यवस्थित कामे करतांना दिसत नाही. कुलर व पंखे अतिशय मंद गतीने फिरतात. कमी व्होल्टेजमुळे कुलरचे पंपही काम करीत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. वीज पुरवठ्यातील अनियमितता व सदोष वीज पुरवठ्यामुळे वीज वितरण कंपनी विरोधात नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
उष्णतेची दाहकता वाढली आहे. सूर्य आग ओकू लागल्याने तापमानातही मोठी वाढ झाली आहे. उष्णतेच्या दाहकतेने जीव कासावीस होऊ लागला आहे. उष्णतेमुळे जीवाची लाही लाही होत असतांना वीज वितरण कंपनीने मात्र अघोषित लोडशेडिंग सुरु केली आहे. केंव्हा व कधी वीज पुरवठा खंडित होईल याची आता शाश्वतीच राहिलेली नाही. दिवसातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. रात्रीही विजेचं जाणं येणं सुरूच असतं. वीज गेली की तासंतास येत नाही. त्यामुळे घरातही उष्णतेने नागरिकांचे बेहाल होतांना दिसत आहे. गरमीत ताटकळत नागरिकांना वीज येण्याची वाट बघावी लागते. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी अकारण खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात वीज पुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच काही भागात अतिशय कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेच्या लपंडावाचा हा खेळ कधी बंद होतो, हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्याही संतापाचा पारा वाढू लागला आहे. विजेच्या लपंडावाने त्यांना स्वतःच्या घरातही चैन पडत नसल्याने ते वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शब्दांची लाखोळी वाहतांना दिसत आहे. विजेच्या लपंडावाचा हा खेळ असाच सुरु राहिल्यास नागरिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकण्याची चिन्हे दिसत असून तशी कुजबुज शहरातून ऐकायला मिळत आहे.
No comments: