कोळसा सायडिंग वरून उडणाऱ्या धुळीमुळे जनजीवन आलं धोक्यात, शहरातील रहिवासी वस्तीलगत आहेत दोन कोळसा सायडिंग
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी रेल्वे सायडिंग वरून उडणाऱ्या कोळशाच्या काळ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले आहे. कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांनाही या कोळसा सायडिंग रहिवासी वस्त्यांपासून दूर हलविण्याकरिता कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. कोळसा सायडिंग वरून मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असल्याने नागरिकांचं परिसरात वास्तव्य करणं कठीण झालं आहे. कोळसा सायडिंगमुळे धूळ प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. सतत उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचं प्रमाण वाढलं असून या प्रदूषित वातावरणात श्वास घेणाऱ्या नागरिकांचा आता श्वास गुदमरायला लागला आहे. नागरिकांना श्वसनाचे विविध आजार जडले असून वाढत्या धूळ प्रदूषणामुळे नागरिकांचं जीवन धोक्यात आलं आहे. रहिवासी वस्तीलगत असलेल्या या कोळसा सायडिंग इतरत्र हलविण्याची नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असतांनाही शासन व प्रशासन त्यांची ही मागणी गांभीर्याने घेतांना दिसत नाही. या कोळसा सायडिंगमुळे रहिवासी वस्ती काळी नागरी झाली असल्याच्या व्यथा येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधी जवळही मांडल्या, प्रसंगी आंदोलन मोर्चेही काढले, वेकोलि व प्रशासनाला निवेदनेही दिली, पण तरीही कोळसा सायडिंग येथून हटविण्यात आल्या नाही. त्यामुळे येथील नागरिक आता तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
नागरिकांची निवासस्थाने असलेल्या परिसरालगत दोन रेल्वेचे मालधक्के आहेत. या मालधक्यांवर कोळसा साठवून तो मालवाहू रेल्वेने विद्युत प्रकल्पांना पुरविला जातो. रेल्वेचा एक मालधक्का वेकोलिला तर एक कोल वॉशरीला देण्यात आला आहे. या दोन्ही मालधक्यांवर दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरु असते. या मालधक्यांवर दर दिवशी तीन ते चार रॅक लोड होतात. ५८ वॅगन असलेल्या तीन ते चार मालवाहू रेल्वे दररोज या मालधक्यांवरून कोळसा भरून निघतात. लोडर मशीनने या ५८ वॅगनमध्ये कोळसा भरला जातो. वॅगनमध्ये कोळसा भरतांना मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडते. तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळेही कोळशाची धूळ उडत असल्याने आसपासचा परिसर नेहमी काळवंडलेला दिसून येतो. नागरिकांच्या घरातील प्रत्येक वस्तूंवर काळ्या धुळीचे थर जमा झालेले दिसतात. गृहिणींना दिवसातून दोन ते तीन वेळा घर स्वच्छ करावं लागत असल्याने त्यांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसतो. कोळसा सायडिंग लगत असलेल्या परिसरातील घर, अंगण व रस्ते कोळशाच्या धुळीमुळे काळे झालेले पहायला मिळतात. कोळशाच्या धुळीमुळे येथील नागरिकांचे तळपाय नेहमी काळे दिसतात. एवढेच नाही तर सकाळी घशातूनही काळेच ठसे बाहेर पडतात.
गौरकार कॉलनी, विठ्ठलवाडी, कणकवाडी व देशमुखवाडी येथील नागरिकांना धूळ प्रदूषणाचा नेहमी सामना करावा लागत असल्याने येथील नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. कोळशाच्या धुळीचे कन त्वचेवर चिकटून रहात असल्याने येथील नागरिकांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण वाढीस लागले आहे. एवढेच नाही तर येथील नागरिकांना श्वसनाच्या विविध आजारांनीही ग्रासले आहे. धूळ प्रदूषणामुळे येथील नागरिकांनी आता आपली घरे विकायला काढली असून काही जन गाव सोडून तर काही जन वेगळ्या परिसरात रहायला गेले आहेत. कोळसा सायडिंग हटविण्याच्या मागणीला घेऊन येथील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन मोर्चे काढले. पण त्यांच्या मागणीची दखलच न घेण्यात आल्याने नाईलाजास्तव त्यांनाच हा परिसर सोडावा लागत आहे. त्यामुळे येथील सुज्ञ नागरिकांनी आता सायडिंग हटावचा नारा बुलंद करण्याचा निर्धार केला असून सायडिंग हटविण्याच्या मागणीला घेऊन येथील नागरिक लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
No comments: