Latest News

Latest News
Loading...

साम्राज्यवाद व भांडवलप्रधान प्रवृत्तीमुळे देशात उत्पन्न झाल्या अनेक सामाजिक समस्या, भन्ते ज्ञानज्योती महाथेरो


प्रशांत चंदनखेडे वणी 

साम्राज्यवाद व भांडवलप्रधान प्रवृत्ती देशात वाढीस लागल्याने अनेक सामाजिक समस्या उत्पन्न होऊ लागल्या असून समाजात भांडवली व्यवस्थेमुळे संयुक्त कुटुंब प्रणाली खिळखिळी होऊन तिचा ऱ्हास होऊ लागला असल्याची मार्मिक प्रतिक्रिया भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. मेघदूत कॉलनी चिखलगाव येथे आयोजित बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी कुटूंब व्यवस्थेत होत असलेल्या बदलाची पार्श्वभूमी आपल्या मनोगतातून मांडली. ते पुढे म्हणाले की समाजातील मध्यमवर्गाकडे भौतिक सुखाची मोठी साधने उपलब्ध असल्याने त्यांची समाजासोबतची नाळ तुटू लागली आहे. ते आपल्याच सुखात मग्न होऊन एककल्ली होऊ लागले आहेत. त्यांची मानसिकता एका वस्तू सारखी झाली आहे, उपभोग घेतला की सोडलं. त्यामुळे नातेसंबंधातही स्वार्थीपणा आला आहे. मी आणि माझे सुख यात लिप्त झालेल्या प्रवृत्तीमुळे संयुक्त कुटुंब प्रणाली लोप पावत चालली आहे. या प्रणालीला जिवंत ठेवायचे असेल तर बुद्ध धम्मात सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुकरण हाच एकमेव पर्याय आहे. 

सम्यक बुद्ध विहार समिती मेघदूत कॉलनीच्या वतीने सम्यक बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात धम्म उपदेशक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वजित कांबळे (पांढरकवडा) होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विजय खोब्रागडे, चिखलगाव ग्रा.प. सरपंच रुपाली कातकडे, ग्रा.प. सदस्य अतुल चांदेकर, सुचिता भगत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून लीलाताई वासेकर उपस्थित होत्या. यावेळी प्रा.डॉ. विश्वजित कांबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. बौद्ध साहित्य हे मानवी जीवनाचे सौंदर्यशास्त्र असून बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ म्हणजे आधुनिक काळातील बौद्ध साहित्याचे त्रिपिटक असल्याचे प्रा. डॉ. विश्वजित कांबळे यांनी आपल्या भाषणात म्हटले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन निता बहादे यांनी केले. 

सायंकाळच्या सत्रात कारवा निळ्या पाखरांचा हा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अजिंक्य तायडे व शुद्धोधन पाटील यांनी हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर केला. पुरोगामी विचारसरणी जोपासणाऱ्या व मानवी दृष्टिकोन जपणाऱ्या व्यक्तींमध्ये महापुरुषांचे विचार व बुद्धाचं तत्वज्ञान रुजविण्याचं कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलं. तथागत गौतम बुद्धांचा अष्टांगिक मार्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली मानवतेची शिकवण अंगिकारल्यास समतेची बाग फुलायला वेळ लागणार नाही, हा मानवी हित साधणारा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सम्यक बुद्ध विहार समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. 

No comments:

Powered by Blogger.