Latest News

Latest News
Loading...

बेशिस्त वाहतुकीमुळे होऊ लागली वाहतुकीची कोंडी, वाहन चालक तुडवू लागले वाहतुकीच्या नियमांना पायदळी


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची होत असलेली कोंडी नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. वाहतुकीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. शहरात सातत्याने वाढत असलेली वाहनांची संख्या व वाहतूक पोलिसांकडून कर्तव्यात होणारी कुचराई वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरू लागली आहे. वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यशून्यतेमुळे वाहतुकीची समस्या आणखीच बिकट होऊ लागली आहे. वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची असलेली अनुपस्थिती वाहतूक कोंडीचे कारण बनू लागली आहे. वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेच्या अभावामुळे वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे. रस्त्याच्या दुतर्फा नियमबाह्य पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडीत आणखीच भर पडू लागली आहे. मुख्य बाजार पेठेत तर नेहमीच वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. खाती चौक ते पहिली तुटकी कमान या वाहतुकीने गजबजलेल्या रस्त्यावर नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतांना दिसतो. तसेच टिळक चौक ते खाती चौक या रस्त्यावरही नेहमी वाहतूकीचा जाम लागताना दिसतो. सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीला तोंड देणाऱ्या नागरिकांमधून आता बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी होऊ लागली आहे. 

बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावून कायमस्वरूपी तोडगा न काढता केवळ कारवायांचे टार्गेट पूर्ण करण्यात वाहतूक पोलिस गुंग असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमांचे केवळ धडे दिले जात आहे, मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असतांना ते मुकदर्शक बनले आहेत. कारवायांचे टार्गेट पूर्ण करण्यातच त्यांचा इंटरेस्ट दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही कर्मचारी एकाच ठिकाणी तळ ठोकून उभे राहतात. परिणामी वाहन चालकांसोबत संबंध जोपासून कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच वाहतुकीचा खोळंबा वाढला आहे. शहरातील वाहनचालकांना शिस्त लावायची सोडून हायवेवरील वाहतुकीला शिस्त लावण्याचे कर्तव्य वाहतूक पोलिसांकडून चोख बजावले जात आहे. शहरात वाहतुकीच्या समस्येने कळस गाठला आहे. पण वाहतूक विभाग वाहतुकीला नियम लावण्याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे. 

शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत चांगलीच भर पडली आहे. ज्यांच्यावर वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली, तेच वाहतूक पोलिस वाहतुकीला नियम लावण्यात कमी पडतांना दिसत आहे. केवळ मुख्य मार्गांवर किंवा काही प्रमुख चौकांमध्ये ठिय्या मांडून वाहन चालकांकडून दंडाच्या पावत्या फाडून आपले टार्गेट पूर्ण करण्यात ते मग्न असतात. वाहतूक पोलिस टार्गेट पूर्ण करण्यातच व्यस्त राहत असल्याने शहरातील वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. वाहतूक विभागात बदल होताच वाहतुकीच्या शिस्तीतही बदल झाला आहे. बेशिस्त वाहतुकीने परत डोके वर काढले आहे. हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. वाहतूकीचे नियम न पाळणे, ड्रायव्हिंग क्षमता परिपूर्ण नसणे, कोणताही इशारा अथवा इंडिकेटर न देता वाहने वाळविणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, सुसाट वाहन चालविणे, वाहन चालवितांना स्पर्धा करणे, मद्यप्राशन करून वाहने चालविणे, बाईक स्टंट करणे आदी अनेक कारणांमुळे रस्ता सुरक्षा धोक्यात आली आहे. शहरात वाहतुकीचा प्रश्न अधिकच जटील झाला आहे. आणि त्यात बेशिस्त वाहतुकीमुळे आणखीच भर पडली आहे. ज्यावेळी वाहतूक सप्ताह राबविला जातो त्याच वेळी वाहतुकीचे नियम गिरविले जातात. चौकाचौकात चेकिंग पॉईंट ठेऊन अपघातास कारणीभूत ठरू पाहणाऱ्या वाहनांवर कार्यवाही केली जाते. पण मोहीम संपली की, वाहन चालकांकडून मात्र परत बेशिस्तपणा अवलंबला जातो. 

शहरातील रस्ते आधीच अरुंद, त्यात रस्त्याच्या दुतर्फा नियबाह्य पद्धतीने वाहने उभी केली जातात. काही वाहन चालक तर रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून आपल्या अकलीचं प्रदर्शन करतात. रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला;अडथळे निर्माण होऊन रस्त्यावर जाम लागताना दिसतात. याकडे वाहतूक पोलिस जराही लक्ष द्यायला तयार नाही. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असतांनाही वाहतूक विभाग केवळ नियामांचा बगलबुवा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वाहतुकीच्या होत असलेल्या कोंडीमुळे नागरिकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत असून वाहतूक विभागाने बेशिस्त वाहतुकीवर कायम तोडगा काढण्याची मागणी शहरवासियांमधून होऊ लागली आहे.      

No comments:

Powered by Blogger.