Latest News

Latest News
Loading...

कुठे रस्त्यावर साचते तळे, तर कुठे रस्तेच नाही बरे, सांगा हे कसे हो रस्ते विकासाचे आराखडे

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वरोरा मार्गावरून वडगाव चौक मार्गे विविध शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या या कमी अंतराच्या रस्त्याचे काँक्रेटीकरण झाल्यापासून या वर्दळीच्या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात तळे साचत असतांनाही या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा केला जात असल्याने या रस्त्यावरील नगर पालिकेचे गाळे घेतलेल्या व्यवसायिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. अगदी पालिकेच्या दुकान गळ्यासमोरच तळे साचून रहात असल्याने येथील व्यवसायिकांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत . अगदी अल्पावधीतच या रस्त्याच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. 

तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, नायलाय व पंचायत समितीकडे जाणारा हा सरळ, सोपा व जवळचा मार्ग असल्याने हा मार्ग रहदारीने नेहमी गजबजलेला असतो. दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठी रेलचेल या मार्गाने पाहायला मिळते. न्यायाधीशांची शासकीय निवासस्थानेही याच मार्गावर आहेत. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानकडे जाण्याचाही हाच जवळचा व सोयीचा मार्ग असल्याने या मार्गावरून अधिकारीवर्गांबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांचेही नेहमी जाणे येणे सुरु असते. एवढेच नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडेही याच मार्गाने जावे लागत असतांनाही प्रशासनाला या रस्त्याची झालेली दुर्दशा व रस्त्यावर साचलेले पाणी दिसू नये, याचेच नवल वाटते. नुकतेच या मार्गाच्या दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. दुभाजकावर स्टीलचे कठडे बसविण्यात आले. विद्रुपतेवर सौंदर्याचा साज चढविण्यात आला. पण विद्रुपता दूर करण्याचे मात्र प्रयत्न करण्यात आले नाही. कुठेतरी खर्च दाखवून निधीची विल्हेवाट लावण्याचे हे प्रकार आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे आता तुमच्या नावासाठी आणि आमच्या गावासाठी होऊ द्या खर्च, म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

वणी वरोरा मार्गावरून वडगाव चौक मार्गे विविध शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या या मार्गावर नगर पालिकेचे दुकान गाळे आहेत. या दुकान गाळ्यांमध्ये अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. पाऊस पडला की या दुकान गाळ्यांसमोरच तळे साचते. त्यामुळे ग्राहक दुकानात जाणे टाळत असल्याने व्यावसायिकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. नेहमीचे ग्राहकही दुकानासमोर साचलेल्या पाण्यातुन दुकानात जाण्याऐवजी तिकडे फिरकनेच पसंत करीत नाही. याचाच परिणाम व्यावसायिकांच्या व्यवसायावर होऊ लागला  आहे. त्यामुळे येथील व्यवसायिक कमालीचे चिंतेत आले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहने या साचलेल्या पाण्यातून वेगवान वाहने चालवीत असल्याने पाणी दुकान गळ्यापर्यंत उडतांना दिसते. त्यामुळे व्यावसायिकांचा मोठा संताप होत असून व्यवसायिकांमधून प्रशासनाविषयी कमालीचा रोष व्यक्त होतांना दिसत आहे. या रस्त्याचे कॉंक्रेटीकरण करतांना रस्त्याचा योग्यरीत्या उतार काढण्यात आला नाही. परिणामी पावसाच्या पाण्याचे रस्त्यावरच तळे साचून राहत असल्याने गाळेधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे बांधकाम झाल्यापासून ही समस्या असतांनाही कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे हाच काय तो विकास, हे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

शहरातील रस्ते विकासाचा विडा उचलून गल्लोगल्ली सिमेंट रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे. रस्ते विकासाला प्राधान्य देऊन शहरात सिमेंट रस्त्यांचं बांधकाम केलं जात असतांना रस्त्याच्या गुणवत्तेकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे. विकासाची गंगा वाहत असल्याचे वाभाडे सुरु असतांना विकास कुठल्या स्तरावर होत आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे. अनेक सिमेंट रस्ते अल्पावधीतच उखडले आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यावरचे सिमेंट उडून गिट्टी दिसू लागली आहे. शहरातील काही परिसरात तर अजून रस्ते बांधकामाचा मुहूर्तच निघालेला नाही. काही ठिकाणी तर रस्त्यांचेच विद्रुपीकरण झाले आहे. संबंधितांची टक्केवारी काढल्यानंतर उरलेल्या निधीतून रस्त्याचे बांधकाम केले जाते. मग रस्ते दीर्घकाळ टिकतील, ही अपेक्षा बाळगणं कितपत योग्य, या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. शहरात बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते आता बोलके झाले आहेत. ठिकठिकाणचे रस्ते खरवडून निघाले आहेत. अल्पावधीतच रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. रस्ते विकासावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. पण पारदर्शकतेकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नव्याने बांधलेले रस्ते दीर्घकाळ टिकाव धरत नाही. शहरात सध्या सिमेंट रस्ते बांधकामाचा सपाटा सुरु आहे. पण रस्ते विकासाचा आराखडा तयार करतांना रस्त्यांची गरज असलेल्या भागांनाच वगळून दुजाभाव करण्यात आल्याची ओरड शहरातून ऐकायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून सिमेंट रस्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या भागांवर कृपादृष्टी न झाल्याने गरजेनुसार नाही तर सोईनुसार रस्ते बांधण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.   

No comments:

Powered by Blogger.