अखिल भारतीय सरपंच संघटना वणीच्या पदाधिकाऱ्यांनी जपली मानवता, अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या धनपाल चालखुरे यांना दिला मदतीचा हात
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील लालगुडा ग्रामपंचायतचे सरपंच धनपाल चालखुरे हे मागील काही दिवसांपासून अर्धांगवायूच्या (लकवा) आजाराने ग्रस्त आहेत. मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होऊ न शकल्याने त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. जवळपास सहा ते सात महिन्यांपासून ते या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सतत त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेऊन अखिल भारतीय सरपंच संघटना वणीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावले आहेत. सामाजिक भान जपत अखिल भारतीय सरपंच संघटना वणीच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच धनपाल चालखुरे यांना मदतीचा हात दिला आहे. ते आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याची जाणीव ठेऊन रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या उपचाराकरिता कुटुंबाला आर्थिक सहाय्यता केली आहे.
सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले धनपाल चालखुरे हे लालगुडा ग्रामपंचायतेचे सरपंच झाले. ते सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावाच्या विकासकामांना हात घातला. अनेक विकासकामे त्यांनी अल्पावधीतच पूर्ण केली. लालगुडा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची जबादारी सांभाळून ते टोल नाक्यावर आपले कर्तव्य पार पाडायचे. सर्वकाही सुरळीत सुरु असतांना अचानक त्यांच्या डोक्यात वेदना होऊ लागल्या. त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे उपचाराकरिता नेण्यात आले. तेथे त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्याचे निदान निघाले. त्यानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारानंतर त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना घरी आणण्यात आले. परंतु याच दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. यावेळी त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे.धनपाल चालखुरे यांच्यावर सतत उपचार सुरु असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेऊन अखिल भारतीय सरपंच संघटना वणीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीला सरसावले. अखिल भारतीय सरपंच संघटना वणीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली. या सभेत उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सामाजिक जाणीव ठेऊन सरपंच धनपाल चालखुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरविले. त्यांच्या उपचाराकरिता आर्थिक साहाय्य करण्याकरिता सर्वांचेच हात पुढे सरसावले. सर्वांनीच आपापल्या परीने आर्थिक मदत देऊन त्यांच्या उपचाराला हातभार लावला. संघटनेचे अध्यक्ष तथा उमरी ग्रामपंचायतचे सरपंच तुकाराम माथनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश बोबडे, हेमंत गौरकार, सरपंच निलेश पिंपळकर, ग्रा.प. सदस्य राजेंद्र ईद्दे यांनी धनपाल चालखुरे यांची एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या कुटुंबीयांकडे आर्थिक सहाय्यतेचा निधी सोपविला. धनपाल चालखुरे हे आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याची जाणीव जपून संघटनेने त्यांच्या कठीण काळात त्यांना मदतीचा हात दिल्याने त्यांचंही मन भरून आलं. आपल्या सरपंच बांधवावर आजाराचा प्रसंग ओढावल्याने त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सरपंचांनी सामाजिक उत्तरदायित्व जपलं आहे. त्यांनी कठीण समयी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन आपल्या सरपंच बांधवाला मदतीचा हात दिल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
No comments: