प्रशांत चंदनखेडे वणी
युवकांनी आपल्या जीवनाचे धेय्य निश्चित करून शिक्षणाचा पाया रचला पाहिजे. धेय्य प्राप्तीसाठी दिवसरात्र एक करून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यानंतरच यश प्राप्त होतं. देशाला आज देशाचा विचार करणाऱ्या युवकांची आवश्यकता आहे. त्याकरिता शिक्षणाबरोबरच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेच्या माध्यमातून स्वतःला घडविल्यास जीवन नक्कीच यशस्वी होईल, असा आशावाद अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
शहरातील वसंत जिनिंग सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर अभाविपचे वणी शाखा अध्यक्ष वैभव दहीकर, नगर मंत्री नीरज चौधरी हे विराजमान होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव दहीकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात अभाविप ही जगातील विशाल अशी विद्यार्थी संघटना असल्याचे सांगतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ही संघटना कटिबद्ध असल्याचे सांगितले. या संघटनेची स्थापना ९ जुलै १९४९ रोजी झाली. युवकांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याबरोबरच युवकांमध्ये देशभक्ती जागविण्याचं कार्य या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आहे. या संघटनेत सतत कार्यशील असलेला संघटनेचा कार्यकर्ता स्वतःचं व्यक्तिमत्व घडवितो. ७५ वर्षांपासून या संघटनेने युवकांना घडविण्याचं काम केलं असल्याचेही वैभव दहीकार यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले.
अभाविपच्या या अमृत महोत्सवी स्थापना दिनाचे औचित्य साधून वणी नगरातील १० वि व १२ वि च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऋषी काकडे यांनी तर आभार प्रदर्शन नीरज चौधरी यांनी केले.
No comments: