प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील लालगुडा ग्रामपंचायतचे सरपंच धनपाल चालखुरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना काल सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले धनपाल चालखुरे हे लालगुडा ग्रामपंचायतचे सरपंच झाले. गावाच्या विकासाची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. ते सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावात विकासकामांना चालना दिली. सर्व काही सुरळीत सुरु असतांना त्यांना अचानक डोक्यात वेदना व्हायला लागल्या. त्यांची चंद्रपूर येथे तपासणी केल्यानंतर त्यांच्या मेंदूला रक्ताचा पुरवठा सुरळीत होत नसल्याचे निदान निघाले. अशातच त्यांना अर्धांगवायूचा (लकवा) झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथे सातत्याने उपचार सुरु होते. पण आजारात आजार वाढत गेले. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु असतांना त्यांनी काल सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. अगदीच कमी वयात आजारामुळे त्यांचं निधन झाल्याने कुटुंबाला दुःखं अनावर झालं आहे. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. अतिशय मनमिळाऊ व सुस्वभावी व्यक्तीमत्व असलेल्या धनपाल चालखुरे यांची सर्वांनाच आपुलकी होती. समाज कार्यातही ते नेहमी अग्रेसर असायचे. गावात सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध जपणारे धनपाल चालखुरे शेवटच्या प्रवासाला निघाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरंगतांना दिसले. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर गावातीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

No comments: