Latest News

Latest News
Loading...

कालबाह्य उत्पादनाची विक्री करणाऱ्या दुकानदाराची मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी काढली खरडपट्टी


प्रशांत चंदनखेडे वणी 

दुकानातून कालबाह्य झालेले उत्पादन विक्री करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी फैलावर घेत त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. राजू उंबरकर यांनी दुकानातील वस्तूंच्या उत्पादन तारखा तपासून पहिल्या असता अनेक उत्पादनांची मुद्दत संपल्याचे त्यांच्या निदर्शनास  आले. त्यांनी ही गंभीर बाब पोलिसांच्याही निदर्शनास आणून दिली. रात्री ९ वाजताच्या सुमारास राजू उंबरकर यांनी स्वतः दुकानात येऊन या दुकानातील एक्सपायरी उत्पादनाचे पितळ उघडले पाडले. यावेळी या दुकानात व दुकानाबाहेर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. राजू उंबरकर यांच्या सतर्कतेमुळे कालबाह्य उत्पादन विक्रीचा हा प्रकार उघडकीस आला. पण अशी किती तरी दुकाने आहेत, जेथे कधी मालाचे निरीक्षणच होत नाही. तेंव्हा संबंधित विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून केवळ गप्पा हाकण्याचे काम करतात की काय, ही चर्चा या निमित्ताने रंगली होती. 

स्थानिक बसस्थानका समोरील एका नामांकित डेली नीड्स या खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानातून कालबाह्य उत्पादनाची विक्री होत असल्याचा प्रकार मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी प्रकाशात आणला. त्यांनी या दुकानातून काही खाद्य पदार्थ खरेदी केले होते. त्या खाद्य पदार्थाच्या उत्पादनाची मुद्दत संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानातून कालबाह्य झालेल्या उत्पादनाची सर्रास विक्री होत असल्याने त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी लगेच डेली निड्स या दुकानात येऊन दुकानदाराला चांगलेच फैलावर घेतले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करून आपली झोळी भरतो काय, असा प्रश्न त्यांनी त्या दुकानदाराला केला. पैसे कमविण्याच्या नादात मुलाबाळांचे आरोग्य धोक्यात आणू पाहणाऱ्या दुकानदाराला राजू उंबरकर यांनी चांगलेच खडे बोल सुनावले. यावेळी नागरिकांनीही दुकानात व दुकानाबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसही तात्काळ दुकानात पोहचले. राजू उंबरकर यांनी हा गंभीर प्रकार पोलिसांच्याही निदर्शनास आणून दिला. एक्सपायरी मालाची विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध नागरिकांमधूनही संताप व्यक्त होतांना दिसत होता. राजू उंबरकर यांच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला असला तरी अशी अनेक दुकाने आहेत जेथे कधी उत्पादनांची तपासणीच होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून नुसते खुर्च्या तोडतात काय, ही चर्चा या निमित्ताने रंगली होती. संबंधित विभागाचे दुकान मालकांशी साटेलोटे असल्याने त्यांच्याकडून कधी दुकानातील मालाचे निरीक्षण होत नसल्याची चर्चाही यावेळी नागरिकांमधून ऐकायला मिळत होती. 


No comments:

Powered by Blogger.