प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरातील जत्रा मैदान परिसर हनुमान मंदिरा समोर असलेल्या फर्निचर दुकानात एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १२ जुलैला सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वडिलांच्या फर्निचरच्या दुकानात रात्री झोपण्यासाठी गेलेल्या मुलाने दुकानाच्या लाकडी फाट्याला दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. दुकानाबाहेर झोपलेला कारागिर जेंव्हा सकाळी दुकानाच्या आत गेला तेंव्हा त्याला तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच दुकान मालकाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. दुकान मालक असलेल्या तरुणाच्या वडिलांनी दुकानाकडे धाव घेत एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
रोशन दिगांबर बावणे (२२) रा. लालगुडा असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाचे वडील हे सुतार काम करीत असून त्यांचे वणी वागदरा रोड वरील हनुमान मंदिरासमोर फर्निचरचे दुकान आहे. त्यांना दोन मुले असून रात्री ही दोन्ही मुले दुकानात आळीपाळीने झोपण्याकरिता जायची. ११ जुलैला रोशन हा दुकानात झोपण्याकरिता गेला होता. त्यांचा कारागीर राकेश सोनटक्के हा देखील दुकानाच्या बाहेर झोपला होता. सकाळी ६ वाजताच्या सुमारास राकेश दुकानाच्या आत गेला असता त्याला रोशन दुपट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच दुकान मालकाला फोन करून ही माहिती दिली. दुकान मालक असलेले तरुणाचे वडील दुकानात पोहचल्यानंतर त्यांनी समोरील दृश्य पाहून एकच हंबरडा फोडला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याने नैराशेतून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.रोशन हा वाहन चालक म्हणून शहरातीलच एका दुकानदाराकडे कामाला होता. त्याचबरोबर कुणाला कार चालकाची आवश्यकता भासल्यास तो रोजीनेही जायचा. काही महिन्यांपूर्वी त्याचं प्रेम प्रकरणही चर्चेत आलं होतं. ते प्रकरण निवळल्यानंतर तो कामात व्यस्त झाला. परवा एका पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाच्याही वेळी तो हजर होता. परंतु काल ११ जुलैला त्याने अचानक जिवनाची नकारात्मक भूमिका घेतली. रात्री त्याने सर्व मित्र मंडळींना फोनवर गुडनाईटचे मॅसेज पाठवले. काही मित्रांशी फोन करून संवादही साधला, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. त्याची सुसाईड नोटही व्हायरल झाली असून त्यात किती तथ्य आहे, हा पोलिस तपासाचा भाग आहे. त्याने निराशावादी मानसिकतेतून आत्महत्या केल्याची चर्चा सुरु असून त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुस्वभावी व हुरहुन्नरी तरुणाच्या अशा या अकाली जाण्याने लालगुडा गावातून व त्याच्या मित्रमंडळींमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.


No comments: