Latest News

Latest News
Loading...

पोलिसांनी सात दुचाकी चोरट्यांना केली अटक, चोरट्यांकडून दोन दुचाक्या जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांनी लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असतांनाच पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर शिकंजा कसला आहे. पोलिसांनी तब्बल सात दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरट्यांनी शहर व तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातल्याने नागरिकांनी या दुचाकी चोरट्यांची चांगलीच धास्ती घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम राबवून वेगगवेगळ्या ठिकाणांवरून सात दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस त्यांच्याकडून त्यांच्या अन्य साथीदारांची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. दुचाकी चोरट्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने पोलिसांची कार्यवाही सुरु आहे.

चोरट्यांनी शहर व तालुक्यात मोटारसायकल चोरीचा सपाटाच लावला होता. हातसफाई दाखवून चोरटे दुचाक्या लंपास करू लागल्याने नागरिक चांगलेच काळजीत आले होते. उभ्या दुचाक्या चोरीला जाऊ लागल्याने नागरिकांनी या चोरट्यांची चांगलीच धास्ती घेतली होती. दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने पोलिसांनीही या घटनांना गांभीर्याने घेत दुचाकी चोरट्यांची शोध मोहीम हाती घेतली. खबऱ्यांना अलर्ट करीत दुचाकी चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले. दुचाकी चोरट्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांना अखेर चोरट्यांचा सुगावा लागला. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून सात चोरट्यांना अटक केली. त्यांच्या जवळून दोन चोरीच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. जमादार दिगांबर किनाके यांना दोन युवक वणी वरोरा मार्गाने दुचाकी ढकलत नेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच त्यांचा पाठलाग करीत या युवकांना वर्धा नदीच्या पाटाळा पुलाजवळ गाठले. त्यांच्याकडे दुचाकी बाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्या दोघांनाही दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात ती दुचाकी ईश्वर गोपाळकृष्ण घाटोळे (२९) यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. ९ ते १० जुलै दरम्यान त्यांची बजाज डिस्कवर कंपनीची दुचाकी (MH २९ AS ८२९२) त्यांच्या तेलीफैल येथील घरासमोरून चोरीला गेली होती. ईश्वर घाटोळे यांनी तक्रारीत नोंदविल्या प्रमाणे आरोपींनी त्याच ठिकाणावरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी आकाश विजय धवने (२३) रा. वनोजादेवी व आकाश विजय अक्कलवार (२४) रा. शांतीनगर, राळेगाव यांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करीत त्यांच्या जवळून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार दिगांबर किनाके करीत आहे. 

दुचाकी चोरी प्रकरणातच डीबी पथकाने पाच आरोपींना अटक केली आहे. तालुक्यातील उमरी येथील पुंडलिक बाळकृष्ण माथनकर या कास्तकाराची शेतासमोरील रोडवर उभी असलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर डीबी पथकाने तपास आरंभला. मुकुटबन पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना डीबी पथकाने ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी २ जुलैला शेतासमोरून दुचाकी (MH २९ Q ५०४२) चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी राहुल मारोती दुर्गे (२७), राजेश संतोष चिंतावार (२१), अक्षय अशोक चेलपेलवार (२०) तिघेही रा. मुकुटबन, रितिक किशोर कन्नाके (२३) रा. पांढरकवडा, शुभम विठ्ठल राऊत (२३) रा. कोसारा ता. झरी, हा.मु. पांढरकवडा या पाचही आरोपींना दुचाकी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली असून त्यांच्यावर कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जवळून २० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या सातही दुचाकी चोरट्यांना आज ११ जुलैला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, दिगांबर किनाके, सुहास मंदावार, हरिन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, पुरुषोत्तम डडमल यांनी केली. 

No comments:

Powered by Blogger.