Latest News

Latest News
Loading...

आमच्याही वार्डात सिमेंट रस्ते होऊ द्या हो, नागरिकांमधून उमटू लागल्या संतप्त प्रतिक्रिया


 



 प्रशांत चंदनखेडे वणी 

विकासकामांचा आराखडा तयार करतांना विकासापासून कोसो दूर राहिलेल्या प्रभागांनाच वगळण्यात आले आहे. विकासकामे करतांना दुजाभाव करण्याची नीती आजही तशीच कायम आहे. जेथे दबाव तेथेच विकास होतांना दिसत आहे. आणि जेथे संयम बाळगला जात आहे, ते प्रभाग आजही भकास दिसत आहेत. कित्येक वर्षांपासून सिमेंट रस्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या भागांना मात्र वाकुल्या दाखविण्याचं काम केलं जात आहे. दुजाभावाची ही परंपरा जाणीवपूर्वक पुढे रेटली जात आहे. शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांचे बांधकाम केले जात असतांना गौरकार कॉलनी व विठ्ठलवाडीतील काही भाग हेतुपुरस्सर डावलण्यात आला आहे. गौरकार कॉलनी येथे अनेक वर्षांपासून सिमेंट रस्ते झालेच नाही. नाल्याही भूमिगत करण्यात आल्या नाहीत. येथील नागरिकांवर विकसनशील भागाचा कर लादल्या जातो. पण गौरकार कॉलनी येथे विकासकामांचे धोरणच राबविण्यात आले नाही. नागरिकांच्या संयमाचा चांगलाच फटका येथील विकासकामांना बसला आहे. शहरात गल्लोगल्ली सिमेंट रस्त्यांचं जाळं विणलं जात असतांना गौरकार कॉलनीवरही कृपादृष्टी होईल काय, हा प्रश्न आता येथील नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. 

शहरात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करतांना काही वार्डांवर मात्र अन्याय करण्यात आला आहे. दुर्लक्षितपणाची झळ सोसणाऱ्या या वार्डांवर आता तरी मेहर नजर होईल, ही येथील नागरिकांना आस लागली होती. पण त्यांच्या वाट्याला याही वेळी वांझोटेपणाच आला. विकासकामांच्या बाबतीत या वार्डाप्रती नेहमीच सावत्रपणा दाखविण्यात आला. विठ्ठलवाडीतील हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता मार्गक्रमण करण्यायोग्य राहिलेला नाही. या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याकरिता येथील नागरिकांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले. पण त्यांना मात्र पाझर फुटला नाही. लोकप्रतिनिधींच्या नजर अंदाज करण्यामुळे नागरिकही दुखावले असून त्यांच्यामधून कमालीची नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. 

गौरकार कॉलनीला तर अनेक वर्षांपासून विकासकामांची प्रतीक्षा लागली आहे. येथील नागरिक सिमेंट रस्त्यांची आस लावून बसले आहेत. भूमिगत नाल्यांची स्वप्न बघून आहेत. जागोजागी फुटलेल्या नाल्यांमुळे परिसरात घाण पसरली आहे. दुर्गंधीने श्वास गुदमरू लागला आहे. येथील रस्त्यांची अवस्था तर पांदण रस्त्यांपेक्षाही वाईट झाली आहे. अतिशय जुनी असलेली ही गौरकार कॉलनी विकासकामांच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत ज्याला नगर परिषदेत निवडून आणले, त्याने गौरकार कॉलनीतील विकासकामे करण्याला ठेंगा दाखविला. याच काळात लाटेत निवडून आलेल्या नागरसेवकानेही विकासकामे करण्यावर भर दिला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आता कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. 

मागासलेला भाग म्हणून गौरकार कॉलनीची ओळख निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींनीही येथील विकासकामे करण्याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत आहे. विठ्ठलवाडी परिसरातून एसीबी लॉन मार्गे वणी वरोरा मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पण पाचभाईच्या चक्कीपासून गौरकार कॉलनीकडे हा रस्ता वाढविण्यात आला नाही. मागील २० ते २५ वर्षांपासून गौरकार कॉलनीकडे जाणारा हा रस्ता आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे. विकासकामे करतांना होणारा दुजाभाव कधी तरी दूर होईल काय, हा संतप्त प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.  

No comments:

Powered by Blogger.