प्रशांत चंदनखेडे वणी
स्थानिक गुन्हे शाखा (यवतमाळ) पथकाने अवैधरित्या धान्य विक्री व देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या आरोपींवर कार्यवाही करून धान्य व दारूचा साठा जप्त केला आहे. अवैधरित्या धान्य व दारूचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या आरोपींवर करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवायांमध्ये पोलिसांनी ४ लाख व ५ लाख ४१ हजार असा एकूण ९ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. अवैध दारू विक्री करणारा आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याला पोलिसांचा सुगावा लागताच तो मिळेल त्या दिशेने पळत सुटला. या दोन्ही कारवाया काल १६ जुलैला यवतमाळ जिल्ह्यातील कारंजी येथे करण्यात आल्या.
यवतमाळ जिल्ह्यातून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश असल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मुडे व पोलिस पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करून अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती गोळा करीत असतांनाच त्यांना पांढरकवडा येथून करंजी मार्गाने अवैध विक्रीकरिता धान्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. गुन्हे शाखा पथकाने सकाळी १०.३० वाजता करंजी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ सापळा रचून टाटा ४०७ या मालवाहू वाहनावर बारीक लक्ष ठेवले. काही वेळातच टाटा ४०७ (MH २० DE २४३४) हे मालवाहू वाहन पांढरकवडा मार्गाने येतांना दिसले. पोलिसांनी त्या वाहनाला थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात तांदूळ भरलेले पोते आढळून आले. वाहन चालकाला तांदूळ साठ्याच्या कागदपत्रा बाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. तांदूळ कुठून आणला व कुठे घेऊन चालला याचीही त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने वाहन चालक व वाहानामध्ये बसून असलेल्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मालवाहू वाहनात जवळपास ८० पोत्यांमध्ये ३ क्विंटल तांदूळ असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या कार्यवाहीत पोलिसांनी ३ क्विंटल तांदूळ किंमत १ लाख रुपये व टाटा ४०७ मालवाहू वाहन किंमत ३ लाख रुपये असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शासनाकडून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता पुरविला जाणारा तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या या कार्यवाहीने समोर आला आहे. गोरगरीब जनतेच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या धान्याचा अशा प्रकारे काळा बाजार करून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. हिंगणघाट येथील काळ्या बाजारात हा तांदूळ विक्री करिता घेऊन जात असल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी सुनिल सूर्यभान वड (४५) रा. कोंघारा, ता. केळापूर व मोरेश्वर अण्णाजी डेहनकर (५६) रा. शास्त्री नगर, पांढरकवडा या दोन आरोपींना अटक केली आहे.
याच दरम्यान पोलिसांना करंजी येथील एक इसम अवैधरित्या देशी दारूचा साठा करून दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे करंजी येथील वार्ड क्रमांक २ येथे राहणाऱ्या गर्जन खैरे याचे घर गाठत नाही तोच आरोपी पोलिसांना पाहून सुसाट पळाला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरात देशी दारूचा अवैध साठा आढळून आला. तसेच त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्यातही दारूच्या शिश्या आढळून आल्या. पोलिसांनी त्याच्या घरातून देशी दारूच्या १८० मिली च्या ३४४ शिश्या किंमत २४ हजार ८० रुपये आणि वाहनातून देशी दारूच्या १८० मिली. च्या ९६ शिश्या व ९० मिली च्या ३०० शिश्या किंमत ११ हजार २२० रुपये अशी एकूण ४१ हजार ३०० रुपयांची देशी दारू जप्त केली. पोलिसांनी या कार्यवाहीत ४१ हजर ३०० रुपये किमतीची दारू व ५ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख ४१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात निक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल मुडे, पोलिस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, प्रशांत हेडाऊ, सुधिर पांडे, निलेश निमकर, भोजराज करपते, सुधिर पिदूरकर, रजनीकांत मडावी, चालक सतिश फुके यांनी केली.




No comments: