प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध लावून त्याला बेड्या ठोकल्या आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नबी गुलाम रजब अली (२२) रा. राजूर (ईजारा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री घरी झोपलेली मुलगी अचानक घरून बेपत्ता झाली. पहाटे ४ वाजता आजीला जाग आल्यानंतर तिला आपली नात झोपून असलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. त्यामुळे आजीला चांगलाच धक्का बसला. तिने नातीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर १० जुलैला नात बेपत्ता झाल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. आपल्या नातीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचाही संशय आजीने तक्रारीत व्यक्त केला. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपीने मुलीला दुर्गापूर (चंद्रपूर) येथे आपल्या नातेवाईकाकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस लगेच दुर्गापूरला रवाना झाले. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकाचे घर गाठून आरोपी नबी गुलाम रजब अली व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्या दोघांनाही वणी पोलिस स्टेशनला आणून मुलीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी भादंवि च्या कलम ३६६ (अ), ३७६,(२)(एन) सहकलम ४,६,१७ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही १३ जुलैला करण्यात आली. आज १५ जुलैला आरोपीला परत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, आशिष झिमटे, पोकॉ. शुभम सोनुले, शंकर चौधरी यांनी केली.


No comments: