प्रशांत चंदनखेडे वणी
भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची घटना काल २३ जुलैला रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. दोन मित्र दुचाकीने वणी वरून राजूर (कॉ.) या आपल्या गावाकडे जात असतांना वणी यवतमाळ मार्गावरील साई मंदिर जवळ भरधाव स्कॉर्पियो या वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी वरील एक जन ठार झाला. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वार तरुणाचा बळी घेणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश रतन गाडेकर (२६) असे या अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
अनियंत्रित वाहतुकीमुळे निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. बेलगाम वाहतुकीला लगाम लावण्यात वाहतूक पोलिस कमी पडतांना दिसत आहे. वर्दळीच्या रस्त्यांवरूनही वाहन चालक सुसाट वाहने चालवितांना दिसत आहे. वाहन चालकांना वाहतूक पोलिसांचा जराही धाक उरल्याचे दिसत नाही. अनियंत्रित वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात व वाहन चालकांना शिस्त लावण्यात वाहतूक पोलिसांना अद्याप यश आल्याचे दिसत नाही. भरधाव स्कॉर्पियो (MH २९ BE ७२६६) या वाहनाने काल रात्री वणी वरून राजूर (कॉ.) या आपल्या गावाकडे परतणाऱ्या युवकांच्या दुचाकीला (MH २९ BY ७०७३) मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी वरील दोघेही तरूण रोडवर पडल्याने एकाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथील रुग्णालयात त्याला दाखल करताच तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आकाश रतन गाडेकर (२६) असे या अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर दुचाकी चालवीत असलेला रंजित हिरामण खोब्रागडे (२८) हा किरकोळ जखमी झाला आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून वाहनासह पसार झाला. पोलिसांनी अनिल धर्माजी भोयर (४७) रा. रंगारीपुरा या स्कॉर्पियो चालकावर भादंवि च्या कलम २७९, ३३७, ३०४(अ), १३४(A)(B) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.


No comments: