राजूर (कॉ.) येथिल जुगारावर पोलिसांची धाड, सात जुगाऱ्यांना अटक व दीड लाखांचा मुद्देमाल जप्त



प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील सार्वजनिक खुल्या जागेवर सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी चार दुचाक्या व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५१ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही २३ जुलैला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. जुगारावरील ही आठ दिवसातील दुसरी कार्यवाही आहे. एपीआय दत्ता पेंडकर यांनी जुगारावर धाडसत्र अवलंबलं असून जुगाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवायला सुरुवात केली आहे. 

राजूर (कॉ.) येथिल वेकोलिच्या बंद अवस्थेत असलेल्या ९६ क्वाटर समोरील पडक्या इमारतीच्या खुल्या सार्वजनिक जागेवर काही इसम गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळत असल्याची विश्वसनीय माहिती एपीआय दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकासह त्याठिकाणी धाड टाकली असता तेथे सात ते आठ इसम जुगार खेळतांना रंगेहात सापडले. रमी हा जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शुभम माणिक खैरे (२६), राजेंद्र बाबुलाल केवट (४२), डोम परसराम कांबळे (७२), श्रीराम नारायण डवरे (६१), अमरदीप प्रकाश नगराळे, प्रशिल दिलीप कांबळे (२०) सर्व रा. राजूर (कॉ.) व नानाजी गणपत झाडे (६०) रा. बोदाड यांचा समावेश असून त्यांच्यावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घातस्थळावरून रोख ६ हजार ६७०, चार दुचाक्या किंमत १ लाख ४५ हजार असा एकूण १ लाख ५१ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, एपीआय दत्ता पेंडकर व पोलिस पथकाने केली. 

राजूर (कॉ.) येथे मजुरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. कोळसा व्यवसाय, खाजगी कंपन्या, चुना भट्टे येथे काम करून ते आपला प्रपंच चालवितात. तसेच रोज मजुरी करून रोजचा उदरनिर्वाह करणारा वर्गही याठिकाणी वास्तव्यास आहे. हा मजुदारवर्ग अल्पशा मिळकतीत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतो. पण त्यांना मटका व जुगाराची लत लागल्याने ते आपली मिळकत जुगारात गमावू लागले आहेत. राजूर कॉलरी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून या अवैध धंद्यांत सामान्य माणूस गुरफटला जात आहे. राजूर कॉलरी येथे मटका अड्डेही राजरोसपणे सुरु आहेत. अगदी ऑटो पॉईंट पासून काही अंतरावरच मटका अड्डा चालविला जात असून वार्ड नंबर ३ येथील पंचशील झेंडा, दीक्षाभूमी बुद्ध विहार परिसर व दारू दुकानाजवळही मटका अड्डे सुरू आहेत. तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात मटक्याच्या आहारी जाऊ लागला आहे. पुरुषांबरोबरच महिलाही मटका जुगार खेळतांना दिसत आहे. मजुरदारवर्ग मटक्याच्या आहारी गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मटका जुगार खेळण्याची सवय जडलेले काही युवक पैशाची पूर्तता करण्याकरिता चुकीच्या मार्गाकडे वळू लागले आहेत. मटका जुगार खेळण्याच्या सवयीपायी युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू आहे. त्यामुळे राजूर (कॉ.) येथे राजरोसपणे सुरु असलेल्या या मटका अड्यांवरही कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी